ग्रामीण भागातही आता ‘ग्रीन जिम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:08 AM2017-07-21T00:08:00+5:302017-07-21T00:08:17+5:30
जिल्हा परिषद : समाजकल्याण समितीच्या बैठकीत निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : चालू आर्थिक वर्षात समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये २० टक्के सेसअंतर्गत अखर्चित राहिलेल्या एक कोटी तीन लाखांच्या निधीतून मागासवर्गीय वस्त्यांमध्ये ग्रीन जिम तसेच ग्रामीण भागात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये बेंच बसविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सभापती सुनीता रामदास चारोस्कर यांनी दिली.
दलितवस्ती सुधारणा योजनांचे अपूर्ण कामे २००५ ते २०१७ पर्यंतच्या कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यात आतापर्यंत एकूण ५,४७२ दलितवस्ती सुधार योजनांची कामे मंजूर होऊन त्यातील ३२७१ कामे पूर्ण असून, सुमारे २२०१ कामे अपूर्ण असल्याचे आढाव्यातून स्पष्ट झाले. यातील बहुतांश कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेली आहेत. फक्त त्यांचा शेवटचा दहा टक्के निधीच्या शेवटच्या हप्त्याची मागणी न करण्यात आल्याने ही कामे अपूर्ण दिसत आहेत. संबंधित कामांच्या दहा टक्के निधीचे प्रस्ताव तातडीने तालुकास्तरावरून पाठवावेत, असे आदेश सभापती सुनीता चारोस्कर यांनी तालुका स्तरावरील सर्व समाजकल्याण विस्तार अधिकाऱ्यांना दिले.
तीन टक्केअपंग सेस निधीअंतर्गत अपंग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. सन २०१७-१८ वर्षासाठी एक कोटी ८० लाख अनुदान उपलब्ध असून, या अनुदानातून अपंग लाभार्थ्यांचे प्रस्ताव शासन निर्णयात नमूद १ ते ३४ योजनांनुसार अपंग लाभार्थ्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्वरित प्रस्ताव प्राप्त करून देण्याच्या सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिल्या.
या समाजकल्याण समितीच्या मासिक बैठकीस सदस्य हिरामण खोसकर, कन्हू गायकवाड, रमेश बरफ, यशवंत शिरसाट, सुरेश कमानकर, शोभाताई कडाळे, ज्योेती जाधव, वनिता शिंदे, सुमनबाई निकम आदी उपस्थित होते.अनेक कामांबाबत तक्रारी प्राप्त दलित वस्ती सुधार योजनांच्या अनेक कामांबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने कामांचा दर्जा सुधारणा होण्याकामी यासंदर्भात गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाचे सर्व उपअभियंता यांची एक स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेश सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले.