१२०० विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर ‘हॅकर’चा डल्ला
By श्याम बागुल | Published: March 20, 2021 01:15 AM2021-03-20T01:15:39+5:302021-03-20T01:16:15+5:30
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या सुमारे बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर अज्ञात ‘हॅकर’ने डल्ला मारल्याचे शाळा तपासणीनंतर उघडकीस आले असून, शिक्षण विभागाने सदरची बाब गांभीर्याने घेऊन पुन्हा नव्याने या विद्यार्थ्यांची नव्याने शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारितील केंद्रीय विद्यालयाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही ‘हॅकर’चा फटका बसला आहे.
नाशिक : इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या सुमारे बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर अज्ञात ‘हॅकर’ने डल्ला मारल्याचे शाळा तपासणीनंतर उघडकीस आले असून, शिक्षण विभागाने सदरची बाब गांभीर्याने घेऊन पुन्हा नव्याने या विद्यार्थ्यांची नव्याने शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारितील केंद्रीय विद्यालयाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही ‘हॅकर’चा फटका बसला आहे.
केंद्र सरकारकडून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या म्हणजे शिख, ख्रिश्चन, पारशी, जैन, नवबौद्ध व मुस्लीम समाजाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी हजार रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती अदा केली जाते. त्यासाठी प्रत्येक शाळेला स्वतंत्र आयडी देऊन नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची माहिती भरली जाते. त्यात विद्यार्थ्यांचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता व त्याची जात व समाज तसेच त्याचे बँक खाते क्रमांक नमूद करण्यात येते. सन २०२०-२१ या वर्षात बहुतांशी शाळांनी अशा प्रकारची माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर भरलेली नसतानाही अज्ञात हॅकरने शासनाची साइट हॅक करून शाळांंच्या आयडीवर बोगस विद्यार्थ्यांची नावे भरली व त्यांच्या नावे जमा होणारी रक्कम हडप केल्याचा प्रकार चार महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. राज्यात हा प्रकार घडल्याने शालेय शिक्षण विभागाने त्याची चौकशी केली असता नाशिक जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचे बनावट नावे टाकल्याचे उघडकीस आले होते.
केंद्र सरकारच्या अखत्यारितील शाळा
त्या आनुषंगाने सर्वच शाळांची तपासणी केली असता, जवळपास आठ ते दहा शाळांमध्ये सदरचा प्रकार उघडकीस येऊन १२३८ विद्यार्थ्यांची नावे बनावट नोंद केल्याचे उघडकीस आले. त्यात केंद्र सरकारच्या अखत्यारितील केंद्रीय विद्यालय एअरफोर्स व ओझर येथील शाळेचाही समावेश आहे. या शाळांचा अनुभव लक्षात घेऊन आता शिक्षण विभागाने आणखी सजग होत नव्याने विद्यार्थ्यांची नावे नोंद केली असून, त्यात जिल्ह्यातील २८,३६१ धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. त्यातील १९,२३३ विद्यार्थ्यांचे अर्जाची छाननी करण्यात आली आहे. हॅकरकरवी झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले आहे.