वेळीच व्हा सावध! विनागॅरंटी कर्जाची ‘नो गॅरंटी’; तुम्हाला कोणी गंडा तर घालत नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 04:49 PM2022-03-04T16:49:51+5:302022-03-04T17:16:55+5:30
सायबर हॅकर्सकडून विविध क्लृप्त्या लढवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क होत सोशल मीडिया असो ...
सायबर हॅकर्सकडून विविध क्लृप्त्या लढवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क होत सोशल मीडिया असो किंवा बनावट फोन कॉल्स यापासून सावध होण्याची गरज आहे. कुठलेही प्रलोभन, भीतीला बळी न पडता आपली सद्सदविवेकबुद्धीचा वापर करत फसवणूक टाळण्यावर भर द्यावा, असे सायबर पोलिसांनी सांगितले.
कुठलीही कंपनी विनाव्याज कर्जपुरवठा करत नाही, तसेच कुठलीही कागदपत्रे न स्वीकारता अनोळखी व्यक्तीला कोणीही कसे कर्ज देऊ शकते? याचा विचारही करायला हवा, असे पोलीस सांगतात. अवघ्या दोन तासांत किंवा २४ तासांत कर्जाची रक्कम कोणीही विनाअटी-शर्तींशिवाय देऊच शकत नाही, यामुळे अशा बनावट कॉल्स करणाऱ्यांना नागरिकांनी प्रतिसाद देणे टाळायला हवे. जेणेकरून आर्थिक फसवणूक होणार नाही.
फसवणुकीची ही घ्या उदाहरणे
नाशिक रोड येथील सैन्य दलाच्या एका केंद्रात नोकरीवर असलेल्या जवानाला अशाच प्रकारे कर्जाची गरज भासली. या जवानाने कर्जपुरवठा करणाऱ्याची माहिती इंटरनेटवर तपासली. त्यानंतर जवानाला मोबाइल क्रमांकावर एक फोन आला. त्या व्यक्तीने स्वत:ला एका नामांकित फायनान्स कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवून त्या जवानाला कर्ज देण्याचे आमिष दाखविले. यानंतर ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली वेळोवेळी १ लाख ९ हजार रुपये उकळले होते. त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास करत बिहार येथून दोघा २० वर्षीय युवकांना या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे सिमकार्ड व आठ मोबाइल जप्त करण्यात आले होते.
अव्वाच्या सव्वा टक्के व्याजदर
कर्ज मंजुरीचे आश्वासन देत कधी शून्य टक्के तर कधी प्रोसेसिंग फी माफ करण्याचे आमिष दाखवत केवळ दहा ते पंधरा टक्के व्याजदराचे आमिष अनेकदा दाखविले जाते; मात्र कर्ज दिल्यानंतर प्रत्यक्षात काही छुप्या पद्धतीने कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम व्याजदराच्या माध्यमातून कर्जदाराकडून घेतली जाते. यामुळे नागरिकांनी अर्थसाहाय्य करणाऱ्या कंपन्यांकडून कर्ज घेताना सर्व बाबींची पडताळणी करून घेणे गरजेचे आहे.
वसुलीसाठी काय पण?
कर्ज देणाऱ्या खासगी संस्था अथवा कंपन्यांकडून कर्जाची परतफेड करताना काही हप्ते थकबाकी राहिल्यास त्याची वसुली करताना कुठल्याही थराला जाण्याचा मार्ग अवलंबविला जातो. यामुळे नागरिकांनी कर्ज घेताना सर्वतोपरी खबरदारी घ्यायला हवी. जेणेकरून नंतर कुठल्याही मनस्तापाची वेळ ओढावणार नाही.