थांबले असते ना बाळासाहेब !
By श्याम बागुल | Published: November 2, 2019 06:04 PM2019-11-02T18:04:56+5:302019-11-02T18:08:37+5:30
राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, अशी भाषा विधानसभा निवडणुकीतील रिंगणातील सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीच्या प्रचारात कोणाचा, किती व कसा लटका विरोध होता हे स्पष्ट झाले आहेच. असाच काहीसा प्रकार नाशिकच्या भूमीत निवडणुकीनंतर घडू लागला आहे.
श्याम बागुल
नाशिक : ‘पाच वर्षे सर्व पदे दिली, अपेक्षा हीच होती की, सेवक म्हणून बाळासाहेब सानप हे काम करतील. परंतु त्यांना पक्षाच्या संस्कृतीचा विसर पडला आणि ते भ्रष्टाचाराच्या गंगेत आंघोळ करणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही’ असा इशारा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पराभूत झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत सानप यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या वळचणीला जावे या दोन्ही घटनांचा अर्थाअर्थी काही तरी संबंध असण्याला वाव आहे. आता प्रश्न एवढाच आहे की सानप भ्रष्टाचाराच्या गंगेत न्हायले असताना त्यांचा सेनेतील प्रवेश मुख्यमंत्र्यांना चालणार का आणि सानप यांचा भ्रष्टाचार ते खपवून घेणार काय?
राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, अशी भाषा विधानसभा निवडणुकीतील रिंगणातील सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीच्या प्रचारात कोणाचा, किती व कसा लटका विरोध होता हे स्पष्ट झाले आहेच. असाच काहीसा प्रकार नाशिकच्या भूमीत निवडणुकीनंतर घडू लागला आहे. गंगेच्या काठावर उभे राहून बाळासाहेब सानप यांच्याविषयी भ्रष्टाचाराचे बोल खुद्द मुख्यमंत्र्यांनी लावल्यानंतर सानप यांची भाजपाने उमेदवारी का कापली यामागचे गुपीत उघड झाले. पार्टी विथ डिफरन्समध्ये गेल्या तीस वर्षांपासून असलेले सानप भ्रष्टाचाराच्या गंगेत आकंठ बुडाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगावे व त्याची साधी भनक नाशिककरांना लागू नये? उलटपक्षी त्याच बाळासाहेब सानपांवर भ्रष्टाचारी असताना भाजपाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या लादून त्यांच्या अगोदरच्या वजनापेक्षा अधिक भार तरी का द्यावा याचे उत्तर मात्र मुख्यमंत्री आपल्या निवडणूक प्रचाराच्या भाषणात देऊ शकले नाहीत. सानप यांच्या मतदारसंघातच त्यांचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे साहजिकच सानप यांच्याकडून पलटवार होणे स्वाभाविक होते, ‘इतकी वर्षे पक्षाचे काम केले तेव्हा भ्रष्टाचार दिसला नाही का’ असा उलट सवाल सानप यांनी केल्यावर त्याला मात्र कोणी प्रत्युत्तर केले नाही. त्यामुळे सानप हे मुख्यमंत्र्यांच्या धमकीला न घाबरता विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी कडवी झुंज दिली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्या लढावू बाण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कौतुक केले. एवढेच नव्हे तर सानप यांचा भाजपातील ३० वर्षांतील संघटन कौशल्याचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी त्यांच्यावर राष्टÑवादीची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याचे सूतोवाचही सानप यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सानप यांच्या भ्रष्टाचारावर जणूकाही राष्ट्रवादीने पांघरूण घातले असताना दुसºयाच दिवशी सानप यांनी थेट ‘मातोश्री’ गाठून सेनेचे शिवबंधन हातात बांधले. आता प्रश्न असा निर्माण होतो, राष्ट्रवादीने सानप यांना उमेदवारी दिली व भाजप-सेनेने मिळून त्यांचा पराभव केला असताना सानप सेनेच्या वळचणीला का गेले हे स्पष्ट होऊ शकले नाही. कुठल्या तरी कार्यक्रमात सानप यांनी आपले राष्ट्रवादीत मन रमू शकले नाही, हिंदुत्ववादी विचाराशीच आपले जुळू शकते म्हणून शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. आता सानप यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिलेला असून, आगामी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे व शिवसेनेचे त्यांना समर्थन राहील हेदेखील तितकेच खरे आहे. अशा परिस्थितीत मित्रपक्ष सेनेत भ्रष्टाचाराच्या गंगेत न्हालेले सानप मुख्यमंत्र्यांना चालतील काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सानप यांचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही ही नाशिककरांच्या साक्षीने केलेली घोषणा शब्दाला पक्के असलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात आणलीच तर बचावाला सत्तेतील पक्षच हवा, अशा हेतूने तर सानप यांनी शिवसेना प्रवेश केला नसावा? अर्थात राजकारणात कधीही काहीही होऊ शकते तसे कोणी कधीच कोणाचा कायमचा मित्र व शत्रूही नसतो त्यामुळे संभाव्य कारवाईच्या भीतीने बाळासाहेब सानप यांनी पक्षांतर करण्याची केलेली घाई जरा अतीच म्हणावी लागेल.