हादरले नाशिक : राजीवनगरमध्ये मध्यरात्री दोघांवर टोळक्याकडून हल्लाशहरात पाच तासांत तीन खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:50 AM2017-12-29T00:50:51+5:302017-12-29T00:51:35+5:30
नाशिक : बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुनांच्या घटनांनी शहर हादरले. साडेआठ ते साडेबाराच्या दरम्यान राजीवनगरमध्ये दोन, तर सिडकोच्या लक्ष्मीनगर परिसरात एक अशा तिघा व्यक्तींवर टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला चढविला.
नाशिक : बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुनांच्या घटनांनी शहर हादरले. साडेआठ ते साडेबाराच्या दरम्यान राजीवनगरमध्ये दोन, तर सिडकोच्या लक्ष्मीनगर परिसरात एक अशा तिघा व्यक्तींवर टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. दोन्ही घटना या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अंबड व इंदिरानगर पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही घटनांमध्ये फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सिडकोतील खुनाच्या घटनेला अवघे काही तास उलटत नाही तोच पुन्हा राजीवनगर भागात टोळक्याने दोघा इसमांवर हल्ला करून खून केला.
इंदिरानगर : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दुचाकीची नुकसानभरपाई न मिळाल्याने सात-आठ जणांच्या टोळक्याने तिघांवर तलवार व कोयत्याने वार करून दोघांचा खून केल्याची घटना बुधवारी (दि़ २७) रात्री अकरा वाजेच्या सुमारास राजीवनगर झोपडपट्टीजवळील कलानगर-लेखानगर रोडवर घडली़ दिनेश नीळकंठ बिराजदार (२२, रा. गणेश चौक, सोनवणे चाळ, नाशिक) व देवीदास वसंत ईगे (रा. राजीवनगर झोपडपट्टी, इंदिरानगर, नाशिक) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी सहा संशयितांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे़ इंदिरानगर पोलीस ठाण्यात रमेश भीमराव गायकवाड (२२, रा़ पाथर्डी गाव, हनुमान चौक, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते दिनेश बिराजदार व देवीदास इगे यांच्यासमवेत दुचाकीने राजीवनगर झोपडपट्टी परिसरातून जात होते. यावेळी संशयित रवि गौतम निकाळजे, सचिन गौतम निकाळजे, दीपक दत्ता वाव्हळ, कृष्णा दादाराव शिंदे, नितीन उत्तम पंडित व बबलू डंबाळे (रा़ सर्व राजीवनगर झोपडपट्टी, इंदिरानगर) यांनी अडविले़ यानंतर रवि निकाळजे याने देवीदास इगेसोबत झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून दुचाकीवरील तिघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली, तर उर्वरित संशयितांनी तलवार व कोयत्याने दिनेश व देवीदास यांच्यावर वार केले. या हल्ल्यात दिनेश व देवीदास हे गंभीर जखमी झाले होते, तर रमेश गायकवाड हल्लेखोरांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरल्याने तो वाचला.
रिक्षाचालक खून प्रकरणातील चौघांना अटक
सिडकोत झालेल्या रिक्षाचालकाच्या खूनप्रकरणी अंबड पोलिसांनी गुरुवारपर्यंत चौघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर तिघे संशयित अद्याप फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दोन महिन्यांपूर्वी मयत रिक्षाचालक साहेबराव जाधव व संशयित गणेश राजेंद्र शिंगटे, प्रवीण राजेंद्र शिंगटे (रा़महाकाली चौक, सिडको), दर्शन उत्तम दोंदे, किरण महेंद्र निरभुवन, संतोष अरुण जाधव (रा़ अभियंतानगर, सिडको) यांच्यामध्ये वाद झाला होता़ साहेबरावने याबाबत पोलिसात तक्रार केल्याचा राग संशयितांच्या मनात होता़
घटनेनंतर परिसरातील नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने हल्लेखोरांनी पळ काढल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिनेशचा जागेवरच, तर देवीदासचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले़