गारठा वाढला : पारा थेट ७ अंशापर्यंत घसरला; नाशिककरांना हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:55 PM2019-01-29T13:55:14+5:302019-01-29T13:59:26+5:30
चालू वर्षी नव्या वर्षाचा पहिला दिवस थंडीने चांगलाच गाजविला. कारण त्यादिवशी सर्वाधिक कमी ६.२ इतके किमान तापमान नोंदविले गेले. आठवडाभरानंतर पुन्हा पारा ६.९ अंशापर्यंत खाली घसरला. यावर्षी थंडीचा कडाका अधिक असून नाशिककर वाढत्या थंडीने हैराण झाले आहे.
नाशिक : शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून मागील आठवडाभरापासून शहरात शीतलहर कायम असल्याने नाशिककर गारठले आहे. तापमानाचा पारा सातत्याने घसरत असून मंगळवारी (दि.२९) सकाळी पारा थेय ७ अंशापर्यंत खाली घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑसह विदर्भ गारठला आहे. काश्मिरच्या द्रास भागात उणे तीशीपार तापमान गेल्याने बर्फ गोठला आहे. मोठ्या प्रमाणात हिमालय व काश्मिरमध्ये हिमवृष्टी होत असल्याने शीतलहर कायम आहे. परिणामी उत्तर महाराष्टÑात वातावरण अधिकाधिक थंड झाले आहे. २०१८च्या तुलनेत यावर्षी जानेवारीमध्ये अधिक थंडीचा कडाका जाणवत आहे. २०१८ साली २५ जानेवारी रोजी ७.२ इतके सर्वाधिक कमी किमान तापमान नोंदविले गेले होते. तर २०१७साली ११ जानेवारी राजी ५.८ आणि २०१६ साली जानेवारीअखेर सर्वात कमी ५.५ अंशापर्यंत पारा घसरल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. चालू वर्षी नव्या वर्षाचा पहिला दिवस थंडीने चांगलाच गाजविला. कारण त्यादिवशी सर्वाधिक कमी ६.२ इतके किमान तापमान नोंदविले गेले. आठवडाभरानंतर पुन्हा पारा ६.९ अंशापर्यंत खाली घसरला. यावर्षी थंडीचा कडाका अधिक असून नाशिककर वाढत्या थंडीने हैराण झाले आहे. कारण डिसेंबर महिन्यात ५.२ अंशापर्यंत तापमान घसरले होते. त्यामुळे नागरिका गारठून गेले होते. जानेवारीच्या पंधरवड्यानंतर थंडीची लाट कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती; मात्र मकरसंक्रांतीनंतरदेखील थंडीची लाट कायम टिकून आहे. सूर्याचे उत्तरायण सुरू असूनदेखील वातावरणात अद्याप उष्मा जाणवत नसल्यामुळे प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. मागील आठवडाभरापासून नाशिककर थंडीच्या तीव्रतेचा सामना करत आहे. उबदार कपडयांचा वापरावर भर देत कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न नागरिक करताना दिसून येत आहे.
जम्मू-काश्मिरमध्ये सलग बर्फवृष्टी; पारा उणे १४ तर द्रासमध्ये उणे३२ अंशापर्यंत
जम्मू-काश्मिरमध्ये सलग सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे वातावरण अधिक थंड झाले आहे. जम्मूच्या लेहमध्ये उणे १७, गुलमर्गमध्ये उणे १२, पहलगाममध्ये उणे १४ तर कटरामध्ये ४.२ आणि श्रीनगरमध्ये उणे५.२ अंशापर्यंत किमान तापमानाचा पारा घसरला आहे.
राज्यातील ही शहरे गारठली (कंसात किमान तापमान)
नागपूर (६.५
मालेगाव (६.८)
अकोला (६.८)
नाशिक (७)
अहमदनगर (७.२)
गोंदिया (७.२)
जळगाव (७.४)
बुलढाणा (७.६)
परभणी (८.२)
पुणे (८.७)
अमरावती (९.४)
चंद्रपूर (९.४)
बीड (९.६)