उमराणेला बेवारस घोड्यांच्या कळपाने ग्रामस्थ हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 04:09 PM2019-01-31T16:09:19+5:302019-01-31T16:10:00+5:30
भीतीचे वातावरण : चा-याअभावी पशुधन वा-यावर
उमराणे : जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे शेतक-यांना पशुधन सांभाळणे कठिण बनले असून चा-याअभावी जनावरांना मोकाट सोडून दिले जात आहे. उमराणे परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाच ते सहा बेवारस घोड्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून त्यांना आवरणे ग्रामस्थांना कठीण होऊन बसले आहे.
येथील गावठाण परिसरातील शेतवस्त्यांवर गेल्या आठ दिवसांपासून पाच ते सहा बेवारस घोड्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. त्यांना हुसकावून लावताना हा कळप प्रतीहल्ला करण्याच्या तयारीत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी सर्वत्र पाऊस कमी झाल्याने चारा व पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतक-यांना चारा व पाण्याअभावी पाळीव पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. असे असतानाच गेल्या आठ दिवसांपासून येथील शेतवस्त्यांवर बेवारस घोड्यांचा कळप फिरत असून शेतक-यांनी पाळीव जनावरांसाठी साठवणुक केलेल्या चा-यावर डल्ला मारला जात आहे. या घोड्यांना हुसकावून लावताना हा कळप प्रतीहल्ला करण्याच्या भीतीने शेतवस्त्यांवरील नागरिक हैराण झाले आहेत.
चारा छावण्या उभारण्याची मागणी
चालुवर्षी कमी पावसाअभावी खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतक-यांजवळ गुरांसाठी चारा व पाणी शिल्लक नाही. त्यामळे महागडे जनावरे बेवारस सोडुन देण्याची वेळ आली आहे. शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याची मागणी जोर धरु लागली आहे.