वाकेतील गारपीटग्रस्त नुकसान भरपाईपासून वंचित
By admin | Published: June 16, 2014 11:59 PM2014-06-16T23:59:01+5:302014-06-17T00:12:37+5:30
वाकेतील गारपीटग्रस्त नुकसान भरपाईपासून वंचित
मालेगाव : तालुक्यातील वाके येथील गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याची तक्रार मधुकर बच्छाव यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाकेतील तलाठी भोये व शेतकी सहाय्यक आढाव यांनी हेतुपुरस्कररित्या फळबाग व डाळिंब बागांचे क्षेत्र कमी दाखवून पंचनामे केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जिराईत आहेत त्यांच्या शेतात कोणतीही पिके नसताना अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली; मात्र ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे खरेच मोठ्या प्रमाणात गारपीटीने नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. संबंधितांनी पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, खोटे पंचनामे करणाऱ्या तलाठी व कृषी अधिकारी यांची चौकशी करावी, अशी मागणी मधुकर वाघ, शिवाजी कानडे, दीपक बच्छाव, शांताराम बच्छाव यांनी पत्रकान्वये केली आहे. याबाबतची निवेदने प्रांत, तहसीलदार यांनाही देण्यात आली आहेत.