गारपिटीने शेतकरी धास्तावला
By Admin | Published: March 1, 2016 11:13 PM2016-03-01T23:13:03+5:302016-03-01T23:20:02+5:30
बेमोसमी पाऊस : वटार, भालूर परिसरात लग्नमंडपात पाणी, कांदा, द्राक्ष, गहू पिकांचे नुकसान
मनमाडष्/वणी : गेल्या काही वर्षांपासून घटलेले पर्जन्यमान आणि गतवर्षी गारांचा मारा यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी यंदाच्या दुष्काळात पाण्याचे टॅँकर आणून वाचविलेले द्राक्षबाग आणि अन्य पिकांना अवकाळी पावसामुळे फटका बसला आहे. परिसरासह दिंडोरी, वणी, पिंपळगाव, भालूर येथे सोमवारी दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे मनमाड शहरातील नागरिकांची धांदल उडाली. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची पळापळ झाली. भालूर, एकवई, धनेर, नवसारीसह परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांनी गर्दी केली असल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. परिसरातील भालूर, एकवई, धनेर, नवसारी गावांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन प्रचंड पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतांमध्ये गारांचा खच पडला होेता. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे कांदा, गहू, हरबरा याबरोबरच द्राक्ष व डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा निर्यात होणारा द्राक्षमाल गारपिटीमुळे खराब झाला आहे.
अशा प्रकारची गारपीट होऊ नये म्हणून चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव, वडाळीभोई आदि परिसरातील शेतकरी धास्तावला आहे. अशाच प्रकारच्या गारपिटीमुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांचा तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतला होता. यंदाच्या दुष्काळात कशीबशी द्राक्ष वाचविली आहेत.
यावर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून, या पावसामुळे कांद्याचे पीक शेतात आडवे झाले आहे. काही ठिकाणी काढणीस आलेल्या कांद्यावर गारपीट झाल्याने कांद्याच्या पातीची शेंडे खुडले गेल्यामुळे पीक संपूर्ण नष्ट होण्याची वेळ आली आहे. अचानक गारपिटीसह झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
लग्नमुहूर्त असल्याने अनेक ठिकाणी सुरू असलेले हळदी आदि कार्यक्रमात अचानक आलेल्या पावसामुळे व्यत्यय आला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मांडवात उघड्यावर लग्न लावण्यात येते. या पावसामुळे विवाहसोहळा असलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
ओझर : शहरासह परिसरात काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु आंबा, द्राक्षांसह अन्य पिकांसाठी मात्र हा पाऊस व ढगाळ हवामान नुकसानकारक असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात ढगाळ हवामान निर्माण होऊन जोरदार वारे वाहत होते. अचानक झालेल्या वातावरणातील या बदलाने उकाड्याने हैराण नागरिकांना काहीकाळ दिलासा मिळाला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक काही भागात पावसाने तुफानी तडाखा दिला. ओझर,टाऊनशिपसह पिंपळगावलाही तुफान पाऊस झाला. द्राक्षबागांवर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकरी धास्तावला आहे. नाशिकशहरासह भगूर, नाशिकरोड, वडाळागाव, सातपूर आदि भागात पावसाने काही काळ जोरदार हजेरी लावली.
गेल्या दोनदिवसांत राज्यातील काही भागात विशेषत: विदर्भातील वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पावसाबरोबर गारपिटीचा तडाखा बसल्याने गहू, हरभरा, संत्रा या पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यात असा पाऊस झाल्यास द्राक्ष, कांदा आदि पिकांचे नुकसान होऊ शकते. (लोकमत चमू)