हिरावाडी, मेरी हायड्रो परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 02:13 PM2017-09-11T14:13:53+5:302017-09-11T14:29:40+5:30
नाशिक, दि. 11- गेल्या चार ते पाच दिवसांपासून हिरावाडी, मेरी हायड्रो परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस जेरबंद झाला आहे. ...
नाशिक, दि. 11- गेल्या चार ते पाच दिवसांपासून हिरावाडी, मेरी हायड्रो परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस जेरबंद झाला आहे. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. मंगळवारी सकाळी मेरी जलगती परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला ताब्यात घेतलं आहे. धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झाल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
नाशिकमधील डावा कालवा बिबट्याचा ‘कॉरिडॉर’ बनला होता. नागरी वस्तीतून जाणाऱ्या कालवा क्षेत्रात बिबट्याचं वारंवार दर्शन घडत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. बिबट्या कधीही नागरी वसाहतीत शिरकाव करू शकतो या भीतीने नागरिक प्रचंड तणावात होते. थेट गंगापूर धरणाच्या जंगलापासून तर हिरावाडीपर्यंत बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.
या कॉरिडॉरमध्ये तीन ते चार पिंजरे लावले गेले होते. पण बिबट्या पिंजऱ्यात अडकत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं सावट कायम होतं. बिबट्याने शनिवारी संध्याकाळी मेरीच्या संरक्षक भिंतीवर दिलेल्या दर्शनाने परिसरातील रहिवाशांची पाचावर धारण बसली. डावा कालवा परिसर हा बहुतांश मळ्यांचा आहे. तसेच पावसामुळे गाजर व रान गवताचेही साम्राज्य पाटालगत वाढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लपण्यास जागा निर्माण झाली आहे. एकूणच हा नैसर्गिक अधिवास बिबट्यासाठी सुरक्षित ठरत असल्यामुळे या परिसरात बिबट्याचा संचार वाढतच आहे. बिबट्याचा या भागात वाढलेला वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याबरोबरच बिबट्यासाठीही धोक्याचाच आहे.
{{{{dailymotion_video_id####x845b6k}}}}