हज-उमराह टुर्स व्यावसायिकाला पावणेदोन कोटींना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 03:29 PM2018-09-13T15:29:20+5:302018-09-13T15:32:41+5:30
सुमारे सहाशे-सातशे भाविक यात्रेकरूंचे सौदी अरेबियाचे तिकिट काढून घेतले; मात्र ठरलेल्या व्यवहारानुसार रक्कम दिली नाही. प्रत्येकी तिकिटाची रक्कम सुमारे ३२ हजार इतकी आहे. फिर्यादी पठाण यांची मागीलदेखील काही रक्कम संशयितांकडून येणे शिल्लक आहे
नाशिक : हज-उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांच्या तिकिटाची रक्कम जुन्या नाशकातील टूर व्यावसायिकाने दिपालीनगर येथील फिर्यादी व्यावसायिकाला परत केली नाही. तसेच दिलेले धनादेश बॅँकेतून वठलेही नाही, त्यामुळे आपली पावणेदोनकोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी अशपाक रमजान पठाण (३२) यांनी संशयित व्यावसायिकांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, १ आॅगस्ट २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ या कालावधीपर्यंत दिपालीनगर येथील अल-खैर टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचे संचालक पठाण यांच्याकडे संशयित आरोपी अब्दुल मतीन मनियार (रा. पॅराडाईज हाईट्स, वडाळारोड), अजीज बनेमिया मनियार, जावेद हनीफ शेख (रा. सेक्टर-२ वाशी, नवी मुंबई), समीर मनियार (काजीपुरा, जुने नाशिक) यांनी त्यांना काही प्रवाशी विमानतळावर अडकले असल्याने ‘आम्ही अडचणीत आलो आहोत, तुम्ही त्यांचे तिकिट काढून द्यावे, आम्ही तुम्हाला तिकिटाच्या रकमेचे धनादेश देऊ’ असे सांगून विश्वास संपादन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ठरलेल्या व्यवहारानुसार १ कोटी ७५ लाख ११ हजार ३२८ रुपये दिले नाही त्यामुळे पठाण यांनी या चौघांविरुध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व संशयितांमध्ये यापुर्वीही असे आर्थिक व्यवहार झाले आहेत. तिकिटासाठी फिर्यादीने भरलेली रक्कम व नफा असा दुहेरी आर्थिक फ टका त्यांना बसला आहे. चौघांनी आपआपसांत संगनमत करुन पुर्वनियोजित कट-कारस्थान रचून विश्वासघात केल्याप्रकरणी पठाण यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हज, उमराह यात्रेसाठी जाणा-या भाविकांना खासगी टुर्समार्फत प्रवास सुविधा पुरविण्याचा पठाण यांचा व्यवसाय दिपालीनगरमध्ये आहे. त्यांनी वर्षभरापुर्वीच हा व्यवसाय सुरू केल्याचे समजते. संशयित चौघेदेखील हज-उमराह यात्रा टुर्सचा व्यवसाय करतात, त्यांनी पठाण यांच्यामार्फत सुमारे सहाशे-सातशे भाविक यात्रेकरूंचे सौदी अरेबियाचे तिकिट काढून घेतले; मात्र ठरलेल्या व्यवहारानुसार रक्कम दिली नाही. प्रत्येकी तिकिटाची रक्कम सुमारे ३२ हजार इतकी आहे. फिर्यादी पठाण यांची मागीलदेखील काही रक्कम संशयितांकडून येणे शिल्लक आहे. संशयितांनी त्यांना त्या रकमेचा धनादेशही दिला; मात्र बॅँक खात्यात धनादेशावरील रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश वठू शकला नाही, तेव्हा फसवणूक झाल्याचे पठाण यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांविरुध्द फिर्याद दिली. याप्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक नंदवाळकर करीत आहेत.