सफाई कामगारांसाठी सर्वत्र हजेरी शेड
By admin | Published: February 9, 2016 11:30 PM2016-02-09T23:30:43+5:302016-02-09T23:31:19+5:30
आश्वासन : अधिकाऱ्यांनी साधला सुसंवाद
नाशिक : महापालिकेच्या सफाई कामगारांची मोबाइल अॅप्सद्वारे सेल्फी हजेरी घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी सहाही विभागीय कार्यालयात सफाई कामगारांशी सुसंवाद साधला. यावेळी येत्या तीन महिन्यांत सर्वत्र हजेरी शेड, त्याठिकाणी मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन प्रशासनामार्फत देण्यात आले.
सफाई कामगारांची मोबाइल अॅप्सद्वारे सेल्फी हजेरी घेण्याला कामगार संघटनांनी विरोध दर्शविल्यानंतर आणि ‘आधी आमच्या समस्या सोडवा, मगच हजेरी पद्धत लागू करा’, असा पवित्रा घेतल्याने आयुक्तांनी सर्व विभागातील सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे व अनिल चव्हाण, उपआयुक्त विजय पगार, हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, दत्तात्रेय गोतिसे यांनी विभागीय कार्यालयांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत अतिरिक्त आयुक्त सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, सफाई कामगारांचा सेल्फी हजेरीला विरोध नाही; परंतु प्रलंबित मागण्यांसंबंधी विचार करण्याचा आग्रह होता. महापालिकेमार्फत वारसा पद्धतीची प्रकरणे लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार निकाली काढली जात आहे. प्रत्येकाला ओळखपत्र, वेतन पत्रिकेवर बॅँक कर्ज वसुलीचा हप्ता नमूद करणे, रजेची बिले तत्काळ काढणे आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारी केलेल्या कामाचा मोबदला अदा करण्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, सर्वत्र हजेरी शेड उपलब्ध करून देणे, हजेरी शेडवर पाणी व स्वच्छतागृहाची व्यवस्था करणे, २५ वर्षे सेवाकाल पूर्ण करणाऱ्या सफाई कामगारांना श्रमसाफल्य योजनेचा लाभ देणे, ग्रॅच्युईटीची रक्कम सेवानिवृत्तीच्या दिवशी अदा करणे याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येणार आहेत. काही प्रस्ताव हे शासन व महासभेच्या मान्यतेनंतर अंमलात आणले जातील, असेही सोनवणे यांनी स्पष्ट केले.