वाहतुकीला एचएएलने नाकारली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:32 AM2020-12-05T00:32:26+5:302020-12-05T00:32:46+5:30
सीबीएस ते कसबे सुकेणे मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बस आणि साधी बस तसेच कृषिमालाच्या वाहतुकीला ओझरच्या एचएएलने परवानगी नाकारल्याने सुमारे दहा गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवासी संतप्त झाले असून, ज्या गावांनी भूमिहीन होऊन एचएएल कारखान्याला जमिनी दिल्या त्याच गावांची एचएएलने आता कोंडी केल्याने संताप व्यक्त होत आहे.
कसबे सुकेणे : सीबीएस ते कसबे सुकेणे मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बस आणि साधी बस तसेच कृषिमालाच्या वाहतुकीला ओझरच्या एचएएलने परवानगी नाकारल्याने सुमारे दहा गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवासी संतप्त झाले असून, ज्या गावांनी भूमिहीन होऊन एचएएल कारखान्याला जमिनी दिल्या त्याच गावांची एचएएलने आता कोंडी केल्याने संताप व्यक्त होत आहे.
ओझर येथील एचएएल कारखान्याने कसबे सुकेणेकडे जाणारा एचएएएल हद्दीतील रस्ता बंद केल्याने कसबे सुकेणेसह सुमारे दहा गावांची वाहतुकीची कोंडी झाली आहे. गेल्या महिनाभरापासून ही नाकेबंदी झाल्याने नागरिक संतप्त झाले असून, एचएएल ने मरीमाता गेट ते मुंबई - आग्रा महामार्ग रस्ता त्वरित सुरू करावा, अशी मागणी कसबे सुकेणे ग्रामपालिकेने एचएएलकडे केली होती. दरम्यान, एचएएलच्या मानव संशाधन विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर अनिल वैद्य यांनी पुन्हा ग्रामपालिकेला पत्र देऊन कोरोना संसर्गचे कारण देत परवानगी नाकारली आहे, अशी माहिती कसबे सुकेणेचे उपसरपंच धनंजय भंडारे यांनी दिली. त्यामुळे बाणगंगा काठच्या गावांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एचएएलकडून गावाची होणारी कोंडी खासदार डॉ. भारती पवार यांनी लक्ष घालून तत्काळ सोडवावी, अन्यथा दहा गावांतील ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी एचएएलच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडतील, असा इशारा प्रवासी संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी व ग्रामपंचायतींनी दिला आहे-
इन्फो
शेतमालाचे नुकसान
नाशिक : ओझरकडून कसबे सुकेणेकडे जाणारी प्रवासी, अवजड वाहतूक ही एचएएल स्थापनेपासून मुंबई-आग्रा महामार्गाच्या उजवीकडून ते मरीमाता गेट अशी होत होती. महामार्गाच्या सहापदरीकरणानंतर हा रस्ता बंद करून कंपनीच्या मुख्य गेटसमोरून टाऊनशिपमधून गेल्या काही वर्षांपासून सुकेणेकडील वाहतूक सुरू होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून हा रस्ताही एचएएलने बंद केल्याने कसबे सुकेणेसह सुमारे दहा गावांतील कृषिमालाची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, तर ओझर शहरात अरुंद रस्त्यांमुळे बस आणि अवजड वाहतूक होत नाही. हलक्या वाहनांची गर्दी ओझर शहरात होत असल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.
एचएएल कारखाना उभारणीच्या काळात कसबे सुकेणे, ओझर, दीक्षी, जिव्हाळे, थेरगाव या गावांतील शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीचे संपादन रेल्वेमार्ग आणि टाऊनशिपसाठी करण्यात आले होते. एचएएलने मात्र याच गावांचा रस्ता बंद करून कोंडी केली आहे. एचएएल दहा गावांचा रस्ता बंद करून अन्याय करत आहे. बस बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. कृषिमाल बाजार समितीत नेता येत नाही. आता आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहोत.
- धनंजय भंडारे, उपसरपंच , कसबे सुकेणे