संरक्षणमंत्र्यांच्या निषेधार्थ एचएएलच्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:36 AM2018-09-22T01:36:36+5:302018-09-22T01:37:16+5:30
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या क्षमतेविषयी संशय घेणारे वक्तव्य करून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी एचएएलच्या कर्मचा-यांनी ओझरहून नाशकात येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. सीतारामन यांनी एचएएलबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे व माफी मागावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिका-यांना सादर केले.
नाशिक : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या क्षमतेविषयी संशय घेणारे वक्तव्य करून संरक्षणमंत्रीनिर्मला सीतारामन् यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी एचएएलच्या कर्मचा-यांनी ओझरहून नाशकात येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. सीतारामन यांनी एचएएलबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे व माफी मागावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिका-यांना सादर केले. एचएएल कर्मचा-यांची पहिली शिफ्ट संपल्यानंतर सुमारे दोनशे ते तीनशे कर्मचा-यांनी ओझर येथून दुपारी मिळेल त्यावाहनाने नाशिक गाठले. कामगार संघटनेचे माजी सरचिटणीस संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३ वाजता बी. डी. भालेकर मैदानावरून हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचा-यांनी संरक्षणमंत्रीनिर्मला सीतारामन यांच्याविरोधात घोेषणाबाजी करून निदर्शने केली व त्यानंतर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, तत्कालीन संरक्षणमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने ओझर येथे लढाऊ विमान बनविणाºया कंपनीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून ५३ वर्षांत मिग-२१, मिग २१ (एम), मिग-२७ व सुखोई-३० इत्यादी विमानांचे उत्पादन करण्यात आले. सुखोई-३०च्या ओव्हरहॉलचे काम जे आजपर्यंत कुणीही केले नाही ते एचएएलने करून दाखविले. सुखोई-३० चे उत्पादन अंतिम टप्प्यात असून, २०१९-२० नंतर एचएएलकडे वर्कलोड नाही. ते मिळविण्यासाठी संरक्षणमंत्री, राज्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थिती समजावून सांगूनही आमच्या पदरात काहीच पडले नाही. उलट फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने घेण्याचा करार करण्यात येत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी एचएएलचे आजी-माजी पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
एचएएलला बदनाम करून राफेलचे काम रिलायन्स डिफेन्स या कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला देण्यात येत आहे. मागील आठवड्यात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी, एचएएलकडे राफेलचे काम करण्याची क्षमता नाही. एचएएल वेळेत काम पूर्ण करू शकत नाही, असे वक्तव्य करून एचएएलला बदनाम केले तसेच कार्यक्षमतेवर संशय घेतला असून, त्याचा जाहीर निषेध करीत आहोत. संरक्षणमंत्र्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.