एचएएलने थकविला ९७ लाख रुपयांचा कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 01:51 AM2021-12-25T01:51:39+5:302021-12-25T01:52:16+5:30
जानोरी येथील ग्रामपालिकेचा सुमारे ९७ लाख रुपयांचा कर एचएएल कंपनीने थकविला असून, अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाठपुरावा करूनही कर देत नसल्याने एचएएल ज्यांच्या अधिपत्याखाली येते, त्या संरक्षण खात्याच्या मंत्र्यांकडेच तक्रार करण्यात आली. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायतीचा थकविलेला कर लवकरच मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
जानोरी : येथील ग्रामपालिकेचा सुमारे ९७ लाख रुपयांचा कर एचएएल कंपनीने थकविला असून, अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाठपुरावा करूनही कर देत नसल्याने एचएएल ज्यांच्या अधिपत्याखाली येते, त्या संरक्षण खात्याच्या मंत्र्यांकडेच तक्रार करण्यात आली. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायतीचा थकविलेला कर लवकरच मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
संरक्षणमंत्री एका कार्यक्रमानिमित्त दोंडाईचा येथे जात असताना, ते जानोरी येथे थांबल्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना ग्रामपंचायतीच्या तक्रारीचे निवेदन दिले. एचएएल हेलकोन व एअरपोर्ट प्रकल्पासाठी जानोरी ग्रामपालिकेने जागा दिली आहे. एचएएलकडे जागा नसल्याने या प्रकल्पास जागा देऊन गावाचा विकास होईल तसेच गावात सुविधा होतील, या उद्देशाने जानोरी ग्रामपालिकेने निर्णय घेऊन ग्रामपालिका हद्दीतील गट क्र. ११३० ही जागा दिली होती. त्या ठिकाणी हॅलकोनचा प्रकल्प उभा असून, बाजूला एअरपोर्ट आहे. या प्रकल्पाचे उत्पन्न एचएएल कंपनीला चालू आहे. सन २००८ पासून ते २०२० पर्यंत हॅलकोन कॉम्प्लेक्सचा ५५ लाख ५० हजार, तर एअरपोर्ट कॉम्प्लेक्सचा सन २०१४ ते २०२० पर्यंत ४२ लाख ४६ हजार इतका कर थकीत आहे. या करासंदर्भात वेळोवेळी एचएएल कंपनीला ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला असून, एचएएल कंपनी देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे भाजपचे सरचिटणीस योगेश तिडके यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची जानोरी एअरपोर्ट येथे भेट घेऊन ग्रामपालिकेच्या थकीत कराबद्दल माहिती देऊन निवेदन दिले. सदर थकीत कर ग्रामपालिकेला तत्काळ मिळावा, त्यातून विकासाला हातभार लागेल, असे त्यांना पटवून देण्यात आले. त्यानंतर संबंधित विषयांसंदर्भात लवकरच कार्यवाही करून आपल्याला पूर्णपणे कर मिळेल, असे आश्वासन सिंग देऊन संबंधित एचएएल अधिकाऱ्यांना लवकर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे उपसरपंच गणेश तिडके, विष्णुपंत काठे, ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ यांनी समाधान व्यक्त केले.