एचएएल संपप्रश्नी आमदारद्वयींची संरक्षण मंत्रालयात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 05:20 PM2019-10-23T17:20:49+5:302019-10-23T17:21:54+5:30
कामगारांना अधिका-यांप्रमाणेच वेतनवाढ आणि इतर भत्ते मिळावेत, या मागणीसाठी गेल्या बारा दिवसांपासून एचएएलमधील कामगारांचा संप सुरू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचा-यांनी देशव्यापी संप पुकारल्याने एचएएलचे कामकाज ठप्प झाले असून, फक्त अधिकारी वर्ग कामावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कामगारांना अधिकाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ आणि भत्ते मिळावेत, यासह विविध मागण्यांसाठी हिंदुस्थान ऐरोनॉटिक्स प्रा. लि. कर्मचाऱ्यांचा गेल्या बारा दिवसांपासून देशव्यापी संप सुरू असून, या संपावर तोडगा काढावा यासाठी खासदार भारती पवार व हेमंत गोडसे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील प्रॉडक्शन सेक्रेटरी सुभाषचंद्र यांची भेट घेऊन निवेदन दिले. दिवाळीपूर्वी या संपावर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
कामगारांना अधिका-यांप्रमाणेच वेतनवाढ आणि इतर भत्ते मिळावेत, या मागणीसाठी गेल्या बारा दिवसांपासून एचएएलमधील कामगारांचा संप सुरू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचा-यांनी देशव्यापी संप पुकारल्याने एचएएलचे कामकाज ठप्प झाले असून, फक्त अधिकारी वर्ग कामावर आहे. संपकरी कामगारांनी यासंदर्भात शासन दरबारी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला असूनही अद्याप शासनाकडून संपाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या गोष्टीची दखल घेत, खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील प्रॉडक्शन सेक्रेटरी सुभाषचंद्र यांची भेट घेतली. कामगारांच्या संपाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाल्याने कामगारांच्या मागण्यांविषयी लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. कामगारांच्या मागण्या न्यायिक असूून, दिवाळीपूर्वीच यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन यावेळी सुभाषचंद्र यांनी दिले. या चर्चेतून अधिकाºयांच्या तुलनेत कामगारांना बारा ते तेरा टक्के वेतनवाढ तर बावीस ते तेवीस टक्के इतर भत्ते दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. याबरोबरच ओझर एचएएलमधील वर्कलोड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, आउटसोर्सिंगचे कामही एचएएलला मिळण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक सुखोईच्या बांधणीचे काम एचएएलला मिळण्याची चिन्हे आहेत.