एचएएल कामगार संघटना निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:17+5:302021-06-29T04:11:17+5:30

ओझरटाऊनशिप : येथील एच.ए.एल. कामगार संघटनेचा कार्यकाळ दि. १५ जून रोजी पूर्ण झाल्याने संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक कधीही ...

HAL trade unions begin to form front for elections | एचएएल कामगार संघटना निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

एचएएल कामगार संघटना निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

Next

ओझरटाऊनशिप : येथील एच.ए.एल. कामगार संघटनेचा कार्यकाळ दि. १५ जून रोजी पूर्ण झाल्याने संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, या पार्श्वभूमीवर संघटनेच्या सत्ताधारी व विरोधी गटांतर्फे मोर्चेबांधणी करण्यात येत असून गुप्त बैठकांच्या माध्यमातून उमेदवार चाचपणीचे काम सुरू झाले आहे. दरम्यान इच्छुकांची संख्या लक्षणीय असल्यामुळे प्रत्येक गट प्रमुखास उमेदवार निवडीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सत्ता पुन्हा आपल्याच गटाच्या ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी गट तसेच मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी विरोधी गटातर्फे जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी व विरोधी गटातर्फे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सरचिटणीस पद हे महत्त्वपूर्ण व अधिकाराचे पद असल्यामुळे हे पद ज्या गटाकडे जाते त्या गटाची सत्ता असते. सरचिटणीस पदासाठी सत्ताधारी गटाकडून कै. रामू जाधव गटाचे सचिन ढोमसे, माजी सरचिटणीस कै. प्रशांत भोजने गटाचे माजी सरचिटणीस संजय कुटे, जागृती विचार मंच गटाचे व माजी प्रभारी सरचिटणीस अनिल मंडलिक यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वांकडून कारखान्याबाहेर कामगारांच्या वैयक्तिक भेटी गाठी घेतल्या जात आहेत.

गेल्या निवडणुकीत तीन वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविलेले हे तीन गट पुन्हा वेगवेगळे पॅनल उभारणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही गटाचे नेते कामगार मित्र मंडळ, विविध जिल्हा व तालुका, विविध समाज, मित्र मंडळासह इतर संघटना यांच्याशी संपर्क साधत असून त्या माध्यमातून आपाआपल्या पॅनलसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी चाचपणी केली जात आहे.

इन्फो...

एचएएल कामगार संघटना पदाधिकाऱ्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ दि. १५ जून रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे कामगार संघटनेची निवडणूक वेळेवर होणे कामगारांना अपेक्षित आहे. संघटनेने व्यवस्थापनाशी त्वरित पत्रव्यवहार करून कामगार संघटनेने निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी कामगारांनी संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांच्याकडे केली आहे. वेळेत व गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात यावी, अशी कामगारांची व गटनेत्यांची मागणी आहे.

Web Title: HAL trade unions begin to form front for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.