अर्धा डझन गुन्हेगार तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:02 AM2019-02-15T01:02:40+5:302019-02-15T01:03:46+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, पोलीस यंंत्रणेलाही निवडणुकीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदासुव्यवस्था टिकून रहावी, याकरिता पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पंचवटी व आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील सराईत अर्धा डझन गुन्हेगारांना दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे.
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, पोलीस यंंत्रणेलाही निवडणुकीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदासुव्यवस्था टिकून रहावी, याकरिता पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पंचवटी व आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील सराईत अर्धा डझन गुन्हेगारांना दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे.
आगामी काळात लोकसभा व त्यानंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे. त्यामुळे शहरात निवडणूक काळात गुन्हेगारीला पायबंद घालता यावा, यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर वक्रदृष्टी केली असून कारवाईला प्रारंभ केला आहे. परिमंडळ एकमधील या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण सहा सराईत गुन्हेगारांना उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तडीपार केले आहे. या संशयितांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्यांना तडीपार केले.
३८ गुन्हेगार रडारवर
परिमंडळ एकमधील आडगाव, पंचवटी, गंगापूर, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अजून ३८ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या संशयितांविरोधात दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे परिमंडळ एकमधील तब्बल ९० गुन्हेगारांना पोलिसांनी यापूर्वी तडीपार केल्याची माहिती उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.