शनिवारच्या तुलनेत रविवारी निम्मेच इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:14 AM2021-05-24T04:14:23+5:302021-05-24T04:14:23+5:30

नाशिक : कोरोनाबाधित मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढत असताना त्यांच्यासाठी जीवनावश्यक असलेल्या ॲम्फोटेरेसिन इंजेक्शनच्या प्रमाणात वाढ होण्याऐवजी ...

Half as many injections on Sunday as on Saturday | शनिवारच्या तुलनेत रविवारी निम्मेच इंजेक्शन

शनिवारच्या तुलनेत रविवारी निम्मेच इंजेक्शन

Next

नाशिक : कोरोनाबाधित मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढत असताना त्यांच्यासाठी जीवनावश्यक असलेल्या ॲम्फोटेरेसिन इंजेक्शनच्या प्रमाणात वाढ होण्याऐवजी घट होऊ लागली आहे. शुक्रवारी २४०, शनिवारी २३४, तर रविवारी अवघी १२२ इंजेक्शन्स प्राप्त झाल्याने नाशिकच्या म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांना कुणीच वाली उरला नसल्याची रुग्णांच्या कुटुंबीयांची भावना आहे. शनिवारी प्रत्येक रुग्णाला किमान एक- एक इंजेक्शन मिळाले, रविवारी तर निम्म्याच रुग्णांना प्रत्येकी केवळ एक इंजेक्शन मिळाल्याने रुग्णांचे कुटुंबीय हतबल झाले आहेत.

जिल्ह्यात शनिवारपर्यंत अधिकृतरीत्या २५४ म्युकरमायकोसिस रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यातही मालेगाव आणि नाशिक शहरांतच सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना शासनाकडून जिल्ह्याला मिळणाऱ्या इंजेक्शनच्या संख्येत होणारी सुमारे निम्मी घट ही रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी क्लेशदायक आणि संतापजनक असल्याची त्यांची भावना आहे. शासनाला जर इंजेक्शन्स उपलब्ध करून देता येणार नसतील, तर ही इंजेक्शन्स बाजारात उपलब्ध होऊ शकतील; अशी व्यवस्था तरी करू देण्याची नागरिकांची मागणी आहे.

इन्फो

नाशिकचा कोटा वाढवावा

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अधिक प्रमाणात नाक, कान, घसातज्ज्ञ किंवा दंतरोगतज्ज्ञ नसल्याने ग्रामीण भागात फारशी प्रकरणे उघडकीस आलेली नाहीत. ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील रुग्णालयांमध्येच भरती झाले आहेत, तसेच उत्तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्येदेखील मोठी हॉस्पिटल्स फारशी नसल्याने तेथील म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णदेखील नाशिकमधील रुग्णालयांमध्येच ॲडमिट होत आहेत. अशा परिस्थितीत उत्तर महाराष्ट्राला मिळणाऱ्या कोट्यातून अन्य जिल्ह्यांतील जितके रुग्ण नाशिकला ॲडमिट आहेत, त्या प्रमाणात नाशिकच्या ॲम्फोटेरेसिनच्या कोट्यात वाढ मिळवून देण्यासाठी स्थानिक नेतृत्वाने कठोर संघर्ष करण्याची गरज आहे.

इन्फो

अनेक रुग्णांचे पुन्हा ऑपरेशन

पुरेशा प्रमाणात ॲम्फोटेरेसिन उपलब्ध होत नसल्याने ज्या रुग्णांचे ऑपरेशन झाले आहे, अशा रुग्णांमध्येदेखील पुन्हा म्युकरमायकोसिसची वाढ होत असल्याचे बहुतांश ईएनटी स्पेशालिस्ट डॉक्टरांना आढळून आले आहे. त्यामुळेच अनेक रुग्णांचे पुन्हा ऑपरेशन करावे लागत असल्याने रुग्णांच्या एकूण खर्चात लाखो रुपयांची भर पडत आहे, तर इंजेक्शनअभावी डॉक्टर पर्यायी गोळ्यांचा वापर करत असले तरी त्या ॲम्फोटेरेसिनइतक्या तात्काळ प्रभावी ठरणाऱ्या नसल्याने बहुतांश रुग्णांच्या आजाराची तीव्रता वाढत चालली आहे.

Web Title: Half as many injections on Sunday as on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.