कालिदास, गायकवाड सभागृहासाठी आता निम्मे भाडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:15 PM2020-12-11T17:15:37+5:302020-12-11T17:18:55+5:30
नाशिक: कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नाट्यव्यवसायाला दिलासा देण्यासाठी नाशिक महापालिकेने महाकवी कालिदास कला मंदिर तसेच भाभानगरच्या दादासाहेब गायकवाड सभागृहाचे तसेच महात्मा फुले कलादालनाचे भाडे निम्मे करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे नाट्य आयोजक कंत्राटदार, रंगकर्मींना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक: कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नाट्यव्यवसायाला दिलासा देण्यासाठी नाशिक महापालिकेने महाकवी कालिदास कला मंदिर तसेच भाभानगरच्या दादासाहेब गायकवाड सभागृहाचे तसेच महात्मा फुले कलादालनाचे भाडे निम्मे करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे नाट्य आयोजक कंत्राटदार, रंगकर्मींना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षभरासाठी ही सवलत देण्याची घोषणा स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी स्थायीच्या बैठकीत केली.
शुक्रवारी (दि. ११) स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाट्यव्यवसायावर गंडांतर आल्यासारखी स्थिती झाली होती. निम्मी उपस्थितीचे निर्बंध लावत शासनाने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली होती; पण आधीच धास्तावलेले रसिक आणि नियमावलीबाबत असलेली संदिग्धता यामुळे कंत्राटदारांना नाटक आणणेदेखील अवघड होऊन बसले होते. दरम्यान, राज्यातील अन्य शहरांमध्येदेखील नाट्यगृहांचे भाडे कमी करण्यात आले होते. त्यामुळेच नाशकातही नाट्यगृहांचे भाडे कमी करण्याबाबतचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयाचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे तसेच नाटकांचे कंत्राटदार राजेंद्र जाधव आणि जयप्रकाश जातेगावकर तसेच रंगकर्मींनी स्वागत केले आहे.