कालिदास, गायकवाड सभागृहासाठी आता निम्मे भाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:15+5:302020-12-12T04:31:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक: कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नाट्यव्यवसायाला दिलासा देण्यासाठी नाशिक महापालिकेने महाकवी कालिदास कला मंदिर तसेच भाभानगरच्या दादासाहेब ...

Half rent for Kalidas, Gaikwad Hall now! | कालिदास, गायकवाड सभागृहासाठी आता निम्मे भाडे!

कालिदास, गायकवाड सभागृहासाठी आता निम्मे भाडे!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक: कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नाट्यव्यवसायाला दिलासा देण्यासाठी नाशिक महापालिकेने महाकवी कालिदास कला मंदिर तसेच भाभानगरच्या दादासाहेब गायकवाड सभागृहाचे तसेच महात्मा फुले कलादालनाचे भाडे निम्मे करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे नाट्य आयोजक कंत्राटदार, रंगकर्मींना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षभरासाठी ही सवलत देण्याची घोषणा स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी स्थायीच्या बैठकीत केली.

शुक्रवारी (दि. ११) स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाट्यव्यवसायावर गंडांतर आल्यासारखी स्थिती झाली होती. निम्मी उपस्थितीचे निर्बंध लावत शासनाने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली होती; पण आधीच धास्तावलेले रसिक आणि नियमावलीबाबत असलेली संदिग्धता यामुळे कंत्राटदारांना नाटक आणणेदेखील अवघड होऊन बसले होते. दरम्यान, राज्यातील अन्य शहरांमध्येदेखील नाट्यगृहांचे भाडे कमी करण्यात आले होते. त्यामुळेच नाशकातही नाट्यगृहांचे भाडे कमी करण्याबाबतचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे तसेच नाटकांचे कंत्राटदार राजेंद्र जाधव आणि जयप्रकाश जातेगावकर तसेच रंगकर्मींनी स्वागत केले आहे.

इन्फो

कालिदासच्या चारही सत्रांचे दर

कालिदासमधील चारही सत्रांचे दर निम्मे करण्यात आले आहेत. त्यात सकाळ सत्र, प्रथम सत्र, व्दितीय सत्र आणि तृतीय सत्रातील कार्यक्रमांचा समावेश आहे. अर्थात प्रत्येक सत्रातील कार्यक्रमाच्या स्वरूपातील बदलानुसार त्यातही तफावत राहणार आहे.

कोट...

राज्यातील परिस्थितीनुसार निर्णय

राज्यात काही ठिकाणी नाट्यगृहांमध्ये भाड्यात ७५ टक्के तर कुठे ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याला अनुसरून नाशिक मनपाकडूनदेखील ५० टक्के भाडेसवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाटकांसह अन्य कार्यक्रमांचे आयोजन सुलभ होऊ शकणार आहे.

- गणेश गीते, स्थायी समिती सभापती

Web Title: Half rent for Kalidas, Gaikwad Hall now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.