निम्मे साधुग्राम रिकामे
By admin | Published: September 19, 2015 11:02 PM2015-09-19T23:02:08+5:302015-09-19T23:03:10+5:30
साधू परतले : आखाडे-खालशांत शुकशुकाट; मंडप ओस
नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून रात्रंदिवस जागे असलेले, साधूंच्या वास्तव्याने गजबजून गेलेले आणि भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे तपोवनातील साधुग्राम कुंभमेळ्याची तिसरी पर्वणी आटोपताच जवळपास निम्म्याहून अधिक रिकामे झाले. उर्वरित खालशांतही पूर्णत: शुकशुकाट असून, साधू-महंत परतीच्या तयारीत व्यस्त आहेत. येत्या दोन दिवसांत साधुग्राम पूर्णत: रिकामे होण्याची चिन्हे आहेत.
कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने तपोवनातील साडेतीनशे एकर जागेत साधुग्राम उभारले. तेथे स्वच्छतागृहे, शौचालये, पाणी, विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. साधारणत: जुलै महिन्यापासून साधुग्राममध्ये देशभरातील साधू-महंतांचा ओघ सुरू झाला. १४ जुलै रोजी पुरोहित संघाचे ध्वजारोहण झाल्यानंतर कुंभमेळ्याचे नगारे वाजू लागले आणि आॅगस्टमध्ये साधुग्राम खऱ्या अर्थाने फुलले. देशभरातील साधू-महंतांना पाहण्यासाठी, त्यांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचे पाय साधुग्रामकडे वळू लागले. त्यामुळे रविवार व अन्य सुटीच्या दिवशी या भागात पाय ठेवायलाही जागा उरत नव्हती. दरम्यान, कुंभमेळ्याच्या प्रथम दोन पर्वण्या झाल्यानंतर मात्र साधुग्राममध्ये भाविकांचा ओघ घटू लागला. बरेच साधूही आपल्या मूळ ठिकाणी परतले. शुक्रवारी तिसरी पर्वणी झाल्यानंतर तर सायंकाळीच अनेक साधूंनी साधुग्राममधील मुक्काम हलवला. काहींनी मात्र पावसामुळे थांबून घेतले आणि साहित्याची आवराआवर, बांधाबांध करीत शनिवारी सकाळी परतीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.
साधुग्राममध्ये सकाळपासूनच वाहने भरण्याचे, मंडप सोडण्याचे, कमानी उतरवण्याचे काम ठिकठिकाणी सुरू होते. खालशातील भांडी, पलंग, गॅस आदि वस्तूंसह किराणा मालाची पोती, अगदी दुचाकी वाहनेही ट्रक, टेम्पोमध्ये भरली जात होती. भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे डोक्यावर गाठोडी घेऊन साधुग्रामबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत होते. एरवी भजन-कीर्तनाने दुमदुमून जाणाऱ्या साधुग्राममध्ये आज शांतता होती. काही तुरळक ठिकाणी प्रवचने सुरू होती; मात्र तेथे भाविकांची संख्या फार नव्हती. दरम्यान, काही मोठ्या खालशांमध्ये युद्धपातळीवर आवरासावर सुरू असून, उद्या मोठ्या प्रमाणात साधू रवाना होणार आहेत. पुढील दोन दिवसांत संपूर्णत: रिकामे होण्याचा अंदाज साधूंनी व्यक्त केला आहे.
भेटू उज्जैनला!
गेल्या दोन महिन्यांपासून कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला एकत्र आलेल्या साधूंनी आता येत्या एप्रिलमध्ये होणाऱ्या उज्जैनच्या कुंभमेळ्यात पुन्हा भेटण्याची ग्वाही देत एकमेकांचा निरोप घेतला. उज्जैनला येत्या एप्रिल व मेमध्ये कुंभमेळा होणार असून, तत्पूर्वी डिसेंबर-जानेवारी अलाहाबादला माघ मेळाही भरणार आहे. साधूंना आता या दोन मेळ्यांचे वेध लागले आहेत.
पावसामुळे तारांबळ
परतीचे वेध लागलेले साधू-महंत शनिवारी आवरासावर करीत असतानाच, सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. बहुतांश खालशांचे मंडप सोडल्याने साधूंचे साहित्य उघड्यावरच होते. ते आडोशाला हलवताना साधूंची धावपळ झाली. तर पाऊस आणखी वाढण्यापूर्वीच काहींनी घाई करीत साधुग्राम सोडले.
आखाड्यांत शांतता
साधुग्रामचे मुख्य केंद्र असलेल्या तिन्ही अनी आखाड्यांमध्येही आज शांतताच होती. त्यांतील बहुतांश साधू गावी परतल्याने मंडप रिकामेच होते, तर काही ठिकाणी वाहने भरण्याची लगबग सुरू होती. आखाड्यांच्या प्रमुख महंतांनी मात्र आज आराम करणेच पसंत केले.
गर्दी घटली
एरवीच्या शनिवार-रविवारी भाविकांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या साधुग्राममध्ये आज मात्र शनिवार असूनही वर्दळ कमीच होती. मुख्य रस्त्याच्या बाजूला बसलेल्या विक्रेत्यांमुळे काहीशी वर्दळ जाणवत होती; मात्र भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात घटला होता.
देणे-घेणे पूर्ण
साधू-महंतांतील हिशेब, आर्थिक देणे-घेणे शुक्रवारी रात्रीच पूर्ण करण्यात आले. सकाळी तिसरे शाहीस्नान करून साधुग्राममध्ये आल्यावरच साधू-महंतांनी व्यवहार पूर्ण केले. कुंभमेळा संपल्यावर आखाडे-खालशांमध्ये ‘बिदाई’ देण्याची प्रक्रियाही रात्रीच पूर्ण झाल्याचे काही साधूंनी सांगितले.