निम्मे तळेगाव महिनाभरापासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 07:32 PM2019-08-19T19:32:52+5:302019-08-19T19:34:02+5:30
अंजनेरी तळेगाव येथे गेल्या एक महिन्यापासून अर्ध्या गावात वीजपुरवठा खंडित असून, वीज कंपनीचे अधिकारी वीजपुरवठा चालू करण्यास टाळाटाळ करीत आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव गेल्या एक महिन्यापासून अंधारात असून, यासंदर्भात वीज कंपनीकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहून अखेर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.
अंजनेरी तळेगाव येथे गेल्या एक महिन्यापासून अर्ध्या गावात वीजपुरवठा खंडित असून, वीज कंपनीचे अधिकारी वीजपुरवठा चालू करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून अर्धे गाव पूर्णपणे अंधारात असून, त्याबाबत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिले जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केल्या. दलित वस्तीतील एक विद्युत खांब पूर्णपणे सडला असून, तो कोण्यातही क्षणी पाऊस, वा-यामुळे कोसळण्याची शक्यता आहे. सदर वीज पोलमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून त्याला लागूनच असलेल्या शाळेला गेल्या महिन्याभरापासून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत तक्रार करून उपयोग होत नाही, पैसे घेतल्याशिवाय काम करणार नाही, असे उघडपणे सांगितले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बहुतांशी घरांमध्ये वीज नसल्यामुळे त्याचा अन्य घटकांवर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येत आहे. वीज कर्मचा-यांकडून गावाला विचारात न घेता किंवा ग्रामपंचायतीची परवानगी न घेता काही व्यावसायिकांना बेकायदेशीर वीज जोडणी करून दिली आहे. अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला. वीजपुरवठा खंडित करणा-या अधिका-यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व एक महिन्यापासून बंद असलेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा, अशा ठरावाचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले. येत्या आठवडाभरात ठरावानुसार कार्यवाही करावी अन्यथा तळेगावातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ खंबाळे विद्युत केंद्रावर आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला. या ग्रामसभेत सरपंच मंगल निंबेकर, उपसरपंच त्र्यंबक पगार, तुकाराम दाते, वामन दाते, रामदास पगार, प्रवीण दाते, संतोष निंबेकर, रामदास दाते, निवृत्ती पगार, योगेश पगार, सोमनाथ दाते, रामभाऊ दाते, ग्रामसेवक आहिरे, महिला बचत गट, पोलीस पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.