सातपूर परिसरात ९० अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:13 AM2018-03-01T01:13:33+5:302018-03-01T01:13:33+5:30
महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या धडक अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत सातपूर परिसरातील त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनधिकृत पक्के बांधकाम, पत्र्याचे शेड हटविण्यात आले. दिवभरात सुमारे नव्वदहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आल्याने ही सर्वात मोठी मोहीम समजली जात आहे. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.
सातपूर : महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या धडक अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत सातपूर परिसरातील त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनधिकृत पक्के बांधकाम, पत्र्याचे शेड हटविण्यात आले. दिवभरात सुमारे नव्वदहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आल्याने ही सर्वात मोठी मोहीम समजली जात आहे. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती. बुधवारी (दि. २८) सकाळी ११ वाजेपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयापासून सुरू झालेल्या कारवाईत रस्त्याच्या कडेला व्यावसायिकांनी अतिक्रमित केलेले पक्के बांधकाम आणि पत्र्याचे शेड हटविण्यात आले. ही मोहीम सातपूर कॉलनी कॉर्नरपर्यंत राबविण्यात आली. विशेष म्हणजे, सातपूर परिसरात राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत एका नगरसेवकाचे अतिक्र मण हटविण्यात आले, तर सातपूर पोलीस चौकीवर उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड आणि ग्रामीण बसस्थानकावरील पत्र्याचे शेडदेखील हटविण्यात आले. पोलीस चौकीचे अतिक्रमण हटविण्यात आल्याने कायदा सर्वांसाठी सारखा असल्याचा संदेश अतिक्रमणधारकांना मिळाला. निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चार विभागांतील सुमारे ५० कर्मचाºयांनी पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविली. मोहिमेची खबर लागताच बहुतांशी व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमित पत्र्याचे शेड काढून घेतले होते.
मोहीम सुरूच राहणार
यापुढेही ही मोहीम अशीच राबविण्यात येणार असून, ज्यांनी अतिक्र मण केलेले आहे त्यांनी ते काढून घ्यावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी दिला आहे.