माजी आमदाराच्या उर्वरित अतिक्रमणांवर पुन्हा हातोडा
By Suyog.joshi | Published: July 9, 2024 06:51 PM2024-07-09T18:51:56+5:302024-07-09T18:52:11+5:30
मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली.
नाशिक : उद्धवसेनेचे माजी आमदार वसंत गिते यांच्या मुंबई नाका येथील उर्वरित अतिक्रमणांवर पुन्हा बुलडोझर फिरविण्यात आला. मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त मयूर पाटील यांच्या उपस्थितीत मनपाच्या अतिक्रमण पथक, पोलिसांनी कारवाई केली. प्रारंभी काही वेळ गिते यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मनपाच्या पथकाशी चर्चा केली. त्यानंतर अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ झाला. महापालिकेच्यावतीने शहरात आठवड्यापासून अतिक्रमण निर्मुलन मोहीम सुरू आहे.
या अगोदर गोविंद नगर, लेखानगर, कालिका मंदिर व द्वारका परिसरामध्ये अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली. परिसरातील व्यावसायिकांनी सामासिक अंतर, रूफ टॉप, दुकानांसमोर उभारण्यात आलेले शेड, वाढीव बांधकाम, बाहेरील बाजूस बांधलेले कठडे, ओटे अतिक्रमण पथकाने उद्ध्वस्त केले.