भंगार बाजारवर उद्या पुन्हा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:44 AM2017-10-11T00:44:09+5:302017-10-11T00:44:22+5:30
अंबड-लिंकरोडवर पुन्हा वसलेल्या भंगार बाजारवर गुरुवारी (दि.१२) हातोडा पडणार असून, महापालिकेने कारवाईची तयारी चालविली आहे. दरम्यान, कारवाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेसह पोलिसांनी संयुक्तरीत्या भंगार बाजार परिसरात संचलन केले.
नाशिक : अंबड-लिंकरोडवर पुन्हा वसलेल्या भंगार बाजारवर गुरुवारी (दि.१२) हातोडा पडणार असून, महापालिकेने कारवाईची तयारी चालविली आहे. दरम्यान, कारवाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेसह पोलिसांनी संयुक्तरीत्या भंगार बाजार परिसरात संचलन केले.
महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची ऐतिहासिक कारवाई केली होती. मात्र, काही महिने लोटताच पुन्हा एकदा भंगार मालाच्या विक्रेत्यांनी आपले व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली. महापालिकेने सदर भंगार बाजार व्यावसायिकांना वारंवार इशारे देऊनही त्यांनी आपल्याच जागांवरील व्यावसायिक अतिक्रमण हटविलेले नाही. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा भंगार बाजारावर हातोडा चालविण्याची तयारी केली. पोलीस आयुक्तालयाने त्याबाबत गुरुवार, दि. १२ आॅक्टोबरपासून पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी दर्शविल्यानंतर महापालिकेने कारवाईची तयारी सुरू केली. त्यानुसार, येत्या गुरुवारी सकाळपासून कारवाईस प्रारंभ केला जाणार असून, त्यासाठी सात पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात एक पथक राखीव ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक पथकात कार्यकारी अभियंता, उपअभियंता, विभागीय अधिकारी यांच्यासह कर्मचाºयांचा समावेश असणार आहे. पोलीस आणि महापालिका दोन्ही मिळून एकूण ७०० कर्मचारी तैनात केले जाणार आहे. याचवेळी प्रत्येक पथकात ६ डम्पर, ३ जेसीबी, २ क्रेन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.