पावणेसहाशे धार्मिक स्थळांवर पडणार हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:55 AM2018-08-08T00:55:51+5:302018-08-08T00:56:14+5:30
नाशिक : शहरातील बेकायदा धार्मिकस्थळे हटविण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू होणार असून, ५७४ धार्मिकस्थळांवर हातोडा चालवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत पोलीस बंदोबस्त देण्याची अधिकृत तारीख कळविल्यानंतरच ही मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले.
नाशिक : शहरातील बेकायदा धार्मिकस्थळे हटविण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू होणार असून, ५७४ धार्मिकस्थळांवर हातोडा चालवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत पोलीस बंदोबस्त देण्याची अधिकृत तारीख कळविल्यानंतरच ही मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेची सुनावणी करताना राज्यातील सर्व बेकायदा धार्मिकस्थळे हटविण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने काही प्रमाणात कार्यवाही करण्यात आली होती. तथापि, आता पुन्हा न्यायालयाने राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना १३ आॅगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार त्यामुळे आता पुन्हा एकदा बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याची माहिती मोहीम राबविण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.७) यासंदर्भात महापालिकेचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी बैठक घेतली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सहायक पोलीस आयुक्त शांताराम गायकवाड, म्हाडाचे प्रादेशिक अधिकारी रमेश मिसाळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयाने बंदोबस्त दिल्याशिवाय मोहीम राबविता येणार नसल्याने पोलीस बंदोबस्त कधी मिळणार याबाबत माहिती द्यावी, असे ठरविण्यात आले. सर्वाधिक बेकायदा धार्मिक स्थळे राज्यातील अन्य ठिकाणांच्या तुलनेत नाशिकमध्ये सर्वाधिक बेकायदा धार्मिक स्थळे असून, त्यामुळेच अशाप्रकारची स्थळे काढण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. यापूर्वी नाशिक शहरात अपवादात्मक दोन ते तीन ठिकाणी निर्माण झालेला तणाव वगळता शांततेत कारवाई झाली आहे. त्यामुळे आताही अशाचप्रकारे कार्यवाही करण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत आहे. यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार २००९ पूर्वीची शहरात ९०८ बेकायदा धार्मिक स्थळे असून, त्यातील २४९ धार्मिक स्थळे नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित ६५९ धार्मिक स्थळांपैकी १५६ हटविण्यात आललो असून, ५०३ शिल्लक आहेत.
२००९ नंतर झालेल्या धार्मिक स्थळांची संख्या १७६ असून, त्यापैकी १०५ काढण्यात आले. आता ७१ शिल्लक आहेत. अशाप्रकारे एकूण ५७४ धार्मिक स्थळे हटविणे बाकी असून, त्यासाठी आता तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय वातावरण तप्त सध्या सणासुदीचे दिवस असून, राजकीय वातावरण तप्त आहे. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन तणाव होणार नाही, अशा पद्धतीने पोलीस यंत्रणा बंदोबस्त देणार असल्याचे वृत्त आहे.