नाशकात दहीपूलावरील तीनमजली अनधिकृत इमारतीवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 07:17 PM2018-03-14T19:17:39+5:302018-03-14T19:17:39+5:30
पालिकेची कारवाई : नोटीस बजावूनही बांधकामाचा प्रकार
नाशिक - महापालिकेच्या नगररचना विभागाने नोटीस बजावूनही सर्रासपणे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या दहीपुलावरील तीन मजली इमारतीवर अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि.१४) हातोडा चालविला. सदर इमारतीत नऊ भाडेकरू भरण्यात आले होते. रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याबरोबरच महापालिकेने आता पक्क्या बांधकामांकडे आपला मोर्चा वळविल्याने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि.१४) सकाळी नेहरूचौक, दहीपूल याठिकाणी फौजफाट्यासह धडक मारली. कानडे मारुती लेनसमोर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या तीन मजली इमारतीतील बांधकाम हटविण्यास सुरूवात करण्यात आली. यावेळी, त्याठिकाणी व्यवसाय करणाºया भाडेकरुंनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु, महापालिकेच्या पथकाने त्यांना वास्तव समजून सांगत दुकानांमधील माल काढून घेण्यासाठी तासाभराची सवलत दिली. पथकाकडून कारवाई अटळ असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यावसायिकांची धावपळ उडाली. या इमारतीत वैष्णवी एनएक्स, मुद्रा फॅशन,निधी फॅशन, गणेश काजे सेंटर, रिअल स्टिच सेंटर आदी दुकाने थाटण्यात आलेली होती. संबंधित व्यावसायिकांनी दुकानातील माल, जमेल तेवढे फर्निचर हटविल्यानंतर पथकाने जेसीबी चालविला तसेच तिनही मजल्यांचे स्लॅब तोडून टाकण्यात आले. दिवसभर सदर मोहीम सुरू होती. अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू असताना बघ्यांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या मोहीमेत पूर्वच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांचेसह मनपाचे २० कर्मचारी, १० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधितांना सूचना केल्या.