बंदिस्त नाल्यांच्या नावाखाली ‘हात की सफाई’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:47 AM2019-06-18T00:47:45+5:302019-06-18T00:48:12+5:30
पावसाळापूर्व नाल्याची सफाई हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात येत असला तरी बहुतांशी नाले बंदिस्त आहेत. विकासकांनी नाले बंदिस्त केले किंवा सपाटच केल्यानंतरही प्रशासनाच्या वतीने सफाईचे काम केले जात असल्याचे सांगितले जात असेल तर नाले सफाईपेक्षा हात की सफाईच ठरावी.
नाशिक : पावसाळापूर्व नाल्याची सफाई हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात येत असला तरी बहुतांशी नाले बंदिस्त आहेत. विकासकांनी नाले बंदिस्त केले किंवा सपाटच केल्यानंतरही प्रशासनाच्या वतीने सफाईचे काम केले जात असल्याचे सांगितले जात असेल तर नाले सफाईपेक्षा हात की सफाईच ठरावी. प्रशासनाने आता कितीही दावे केले तरी नाले खरोखरीच स्वच्छ केले होते काय यांची परीक्षा मात्र मुसळधार पावसानंतरच होणार आहे.
मुंबई महापालिके प्रमाणेच नाशिक महापालिकेचा नालेसफाई हा वार्षिक कार्यक्रम असतो आणि तो तितकाच संशयास्पद असतो. पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका पूर्वतयारी म्हणून जी काही कामे करते त्यात कितपत तथ्य असते हे मात्र पावसाळ्यातच कळते. पश्चिम विभागाचे दोन भाग पडतात. त्यातील काही भाग गावठाणाला जोडलेला आहे. तर उर्वरित भाग कॉलेजरोड, गंगापूररोडसारखा उच्चभ्रू वसाहतींचा आहे.
गोदावरीला थेट मिसळणारा सरस्वती नाला आता बंदिस्त झाला आहे. तथापि, शहरातील पावसाळी गटार आणि भुयारी गटार या दोन्ही योजनेत पावसाचे वेगाने वाहणारे पाणी कहर करते. गावठाण भागात आणि तेही उतारावर असलेल्या सखल भागात पाणी साचते. त्यामुळे सराफ बाजार, कापड बाजार, भांडी बाजार यांसारखा मोठा भाग प्रभावित होतो. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि नंतर ते दोन दोन दिवस झिरपत नाही. यंदा महापालिकेने नाले सफाई केल्याचा दावा केला असला तरी या मूळ गावठाणाकडे लक्ष पुरवलेले नाही. सराफ बाजारातील नाले साफच झाले नसल्याची तक्रार या भागातील विक्रेते-व्यावसायिक करीत आहेत.
पश्चिम भागात चोपडा नाला आता बंदिस्त झाला आहे. विसे मळा, विद्या विकास सर्कल जवळील नाला असे अनेक नाले विकासाच्या नावाखाली जमिनीखाली गेले आहेत किंवा काही ठिकाणी विकासकांनी ते गायबच केले आहेत. महापालिकेचे राजीव गांधी भवन हेदेखील नाल्यावरच उभे आहे. तथापि, हे नाले कितपत साफ होतात ही शंका आहे.
कॅरीबॅगमुळे तुंबतात नाले
पावसाळ्यात हे नाले तुडुंब भरून रस्त्यावर पाणी साचते, तेव्हा नाल्यांच्या सफाईचे पितळ उघडे पडते. महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर किंवा सरकारवाडा पोलीस ठाणे, गंगापूररोड विद्या विकास सर्कल, कॉलेजरोडवर आसावरी चेंबर ही नेहमीच्या पाणी साचणाऱ्याची ठिकाणे असून बहुतांशी ठिकाणी चेंबरमधून पाणी उफाळून बाहेर येत असते. महापालिकेने नाल्याची स्वच्छता केली असेल आणि प्रवाही केले असेल तर पाणी साचायलाच नको, मात्र असे घडलेच तर मग पावसाचा वेग खूप होता, मर्यादेपेक्षा अधिक पाऊस कमी वेळात झाला किंवा नागरिकांनी फेकलेल्या कॅरिबॅगमुळे नाले तुंबले अशाप्रकारचा दावा केला जातो.