महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा गोबापूर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा महिन्यापासून खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:04 AM2018-02-04T00:04:52+5:302018-02-04T00:24:26+5:30
कळवण : तालुक्यातील गोबापूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गोबापूर, खांडवीपाडा, पाळेपिंप्री, मार्केडपिंप्री या गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकबाकीच्या कारणावरून बंद करण्यात आल्यामुळे या चार गावांना महिन्यांपासून पाणी नाही
कळवण : तालुक्यातील गोबापूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गोबापूर, खांडवीपाडा, पाळेपिंप्री, मार्केडपिंप्री या गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकबाकीच्या कारणावरून बंद करण्यात आल्यामुळे या चार गावांना महिन्यांपासून पाणी नाही त्यामुळे गोबापूरच्या संतप्त आदिवासी महिलांनी गोबापूर ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून घेराव घातला. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा तहसील कार्यालय व पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही महिलांनी यावेळी दिला. ग्रामपंचायत गोबापूर व महावितरण यांच्यात तू तू-मै मै चालले आहे. थकबाकी वसुली मोहीम महावितरणने सुरु केली आहे, तर थकबाकी भरण्याची ग्रामपंचायतकडे तरतूद नसल्याने दोन्ही विभागाने घेतलेल्या आडमुठे धोरणामुळे आदीवासी जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. तालुक्यातील १३३ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकबाकीमुळे खंडीत झाल्याने या योजनांवरील गावामध्ये ही समस्या आहे. गोबापूर ग्रृप ग्रामपंचायत अंतर्गत गोबापूर , खांडवीपाडा , पाळेपिंप्री, मार्केडपिंप्री येथील आदीवासी बांधवांनीच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गोबापूर येथील महिलांनी वीजवितरण कंपनी व ग्रामपंचायत प्रशासन विरोधात हंडा मोर्चा काढुन ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडला. गोबापूर, खांडवीपाडा, पाळेपिंप्री, मार्केडपिंप्री या गावांतील सार्वजनीक पाणीपुरवठा योजनेचे अनेक वर्षांपासून १० लाखांहून अधिक रकमेचे वीजबिल थकलेले आहे. आदिवासी गाव असल्याने महीनाभरापासून पाणीपुरवठा बंद असूनही लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची भावना येथील आदीवासी महिलांची आहे.
त्यामुळे शनिवारी दुपारी एक वाजता संतप्त आदीवासी महिलानी रणरणत्या उन्हात ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ठिय्या मांडून आंदोलन केले. यावेळी गोबापूर गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.