ॲल्युमिनियमचे २१ पाईप लांबविणाऱ्यांना ठोकल्या बेड्या; कारखान्यांमधील चोरीचे गुन्हे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:55 PM2021-03-21T16:55:20+5:302021-03-21T16:56:49+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नागर यांच्या पथकाने पोलिसांनी जुना पाट रस्ता गणेशनगर, गंगापूर शिवारात सापळा रचला. सराईत गुन्हेगार या ठिकाणी आले असता संशयास्पदरीत्या हालचाल करत असल्याचे लक्षात येताच पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखान्यांमध्ये रात्रीच्या सुमारास शिरकाव करत ॲल्युमिनियम, कॉपरसारख्या धातूच्या वस्तू लांबविणाऱ्या तिघा चोरट्यांच्या सातपूर गुन्हे शोध पथकाने मुसक्या बांधल्या आहेत. त्यांच्याकडून कारखान्यांमधील चोरीचे वेगवेगळे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (दि.१६) सातपूर येथील राजेंद्र इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्यातून ३० हजारांचे ॲल्युमिनियमचे पाइप लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी गुन्हे शोध पथकाला दिला. यानंतर पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत त्यामधील संशयितांच्या वर्णनावरून तपासाला गती दिली.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नागर यांच्या पथकाने पोलिसांनी जुना पाट रस्ता गणेशनगर, गंगापूर शिवारात सापळा रचला. सराईत गुन्हेगार या ठिकाणी आले असता संशयास्पदरीत्या हालचाल करत असल्याचे लक्षात येताच पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता योगेश विजय मराळ (२६, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर), अशोक बाहू जाधव (३३) आणि रवींद्र ऊर्फ राऊडी अशोक धोत्रे (१९, दोघे रा. प्रबुद्धनगर, सातपूर) अशी त्यांनी स्वत:ची नावे सांगितली. त्यांची कसून चौकशी करत पोलिसांना त्यांनी पाइप चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून १५ हजार २०० रुपये किमतीचे ॲल्युमिनियमचे पाइप हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांनी यासह अन्य कारखान्यांमध्येही यापूर्वी चोरी केल्याची कबुली दिली असून याबाबत अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सातपूर पोलिसांनी वर्तविली आहे.