जमिनीतून सोने काढून देणाऱ्या भोंदूबाबाच्या हातात बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 01:26 AM2020-12-17T01:26:43+5:302020-12-17T01:27:50+5:30
लॉकडाऊन काळात इंदिरानगर भागातील एका आश्रमातील सामाजिक कल्याणकारी कामाच्या नावाखाली तसेच स्वत:जवळील सोने यज्ञ व होमहवन केल्याशिवाय कोणालाही विकता येणार नसल्याचे कारण सांगून एका वृद्धाला ५२ लाखांना गंडा घालणाऱ्या फरार भोंदूबाबाला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने शिताफीने शोध घेत बेड्या ठोकल्या.
नाशिक : लॉकडाऊन काळात इंदिरानगर भागातील एका आश्रमातील सामाजिक कल्याणकारी कामाच्या नावाखाली तसेच स्वत:जवळील सोने यज्ञ व होमहवन केल्याशिवाय कोणालाही विकता येणार नसल्याचे कारण सांगून एका वृद्धाला ५२ लाखांना गंडा घालणाऱ्या फरार भोंदूबाबाला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने शिताफीने शोध घेत बेड्या ठोकल्या. संशयित गणेश जयराम जगताप (३७, रा. पाथर्डी फाटा) असे या भोंदूबाबाचे नाव आहे.
इंदिरानगर येथील फिर्यादी जगन्नाथ खंडेराव जाधव यांना मे २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत संशयित गणेश याने ५२ लाख रुपयांना गंडा घातला होता. संशयित जगताप याने जाधव यांना रुग्णालय आणि मुलींचे वसतिगृह बांधायचे आहे, असे सांगितले. त्यासाठी पैशांची गरज असून, आमच्याकडे सोने आहे, मात्र ते यज्ञ केल्याशिवाय विकता येणार नाही, असे सांगत विश्वास संपादन केला. ‘तुम्ही पैसे द्या, यज्ञ केल्यानंतर आम्ही तुमचे पैसे परत देऊ’ असे खोटे आश्वासन दिले आणि ५२ लाख रुपयांना गंडा घातला. त्याचप्रमाणे उखराज दीपाजी चौधरी यांना देखील या भोंदूबाबाने जमिनीतून सोने काढून देतो, असे आमिष दाखवून ११ लाख २६ हजार रुपयांना चुना लावला होता. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शांताराम महाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी पथक तयार करत मुंबई गाठली. मुंबईत सापळा रचून जगतापाला पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
---इन्फो---
जगतापाविरुद्ध फसवणुकीचे १४ गुन्हे
भोंदूगिरी करणाऱ्या जगतापाकडून पोलिसांनी चार वेगवेगळ्या प्रकारचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे बोधचिन्ह असलेले बनावट सोन्याचे ४० नाणे, कोरेकरकरीत स्टँपपेपर हस्तगत केले आहेत. जगतापविरोधात धनादेश न वटल्याप्रकरणी १४ गुन्हे दाखल आहेत. जगतापाचा ताबा इंदिरानगर पोलिसांना देण्यात आला असून, ते पुढील तपास करीत आहेत.