पुण्यात वृद्धेचा खून करणाऱ्यास शहरात बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:46+5:302020-12-06T04:15:46+5:30
आळे फाटा वेशीजवळ जानकीबाई अर्जुन चौरे (६०) या महिलेचा शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास लाकडी दंडुक्याने मारून व कोयत्याने ...
आळे फाटा वेशीजवळ जानकीबाई अर्जुन चौरे (६०) या महिलेचा शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास लाकडी दंडुक्याने मारून व कोयत्याने मानेवर वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. पुणे येथील साकोटी येथे राहणारा संशयित आरोपी अर्जुन शुभनारायण प्रसाद (२७) हा आळे फाटा येथे कामाला असून, खुनाच्या घटनेनंतर तो फरार होता. संशयित अर्जुन प्रसाद याला पैशाची गरज असल्याने त्याने दागिदे घातलेल्या जानकीबाई यांना लक्ष्य करत त्यांचा खून केला. यानंतर त्यांच्या अंगावरील सोने चोरून नेल्याचे तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणी पुणे ग्रामीण आळे फाटा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर संशयित अर्जुनप्र साद हा आपल्या मूळ बिहार जिल्ह्यातील छपरा जिल्ह्यातील गौळा येथे रेल्वेने पळून जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.५) दुपारी नाशिकरोड रेल्वेस्थानक गाठले. त्यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विष्णू भोये यांच्याशी संपर्क साधून संशयित आरोपीचा फोटो, वर्णन आदी सर्व माहिती दिली.
कोरोनामुळे रेल्वेस्थानकाचे फक्त एकमेव मुख्य प्रवेशद्वार सुरू असून, पुणे पोलीस रेल्वे पोलीस ठाण्याचे हवालदार संतोष उफाडे, हवालदार चंद्रकांत उबाळे, शिपाई महेश सावंत आदींनी तेथेच सापळा रचला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास बिहारला जाणारी पवन एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकात आली. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी संशयित आरोपी अर्जुन प्रसादला प्रवेशद्वारावरून ताब्यात घेतले.
--
फोटो आर वर ०५अर्जुन