वनविभागाच्या वर्दीतील ठगबाज बापलेकांना बेड्या; बनावट ओळखपत्र, शिक्के जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:38 PM2020-12-05T17:38:02+5:302020-12-05T17:44:34+5:30
लग्नासाठी त्याने मुलीच्या माता-पित्यांकडे व मुलीकडे अडीच एकर शेतीची मागणी करत धमकावण्यास सुरुवात केल्याचाही प्रकार पुढे येत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
नाशिक : वनखात्यात उपविभागीय अधिकारी पदावर असल्याचे सांगून थेट वर्दी घालून मिरविणाऱ्या एका बीडच्या ठगाला नांदगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या चमूने मनमाड चौफुलीवर सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले. लहू साहेबराव जायभावे (३५, रा. बीड) असे या संशयित ठगबाजाचे नाव असून, त्याला अशाप्रकारे सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करण्यासाठी स्वत: त्याचे वडील साहेबराव जायभावेदेखील मदत करत असल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे.
याबाबत पूर्व नाशिक वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, वनविभागात 'मी उपविभागीय अधिकारी असून, तुम्हाला भरती व्हायचे असेल तर मला दहा हजार मोजा' असे सांगून हा बहाद्दर थेट वर्दी घालत वनविभागाचे बनावट नियुक्ती आदेश व ओळखपत्र दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घालत होता. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वनक्षेत्रपाल दत्तात्रय बोरसे यांनी पथक तयार करून येथील एका चहाच्या टपरीलगत सापळा रचला. संशयित लहू हा तेथे वनविभागाच्या शासकीय वर्दीमध्ये दाखल झाला असता त्यास पथकाने ताब्यात घेतले.
नांदगाव येथील ज्ञानेश्वर नीळकंठ इप्पर (रा.कासारी), सचिन भागवत सानप (रा.बेजगाव) सखाराम पुंजाबा भुसनर (रा. माहेगाव) यांच्याकडून लहूने वनखात्यात भरती सुरू असल्याचे सांगत प्रत्येकी पाच ते दहा हजारांची मागणी केली होती. या मागणीनुसार लहू हा चहाच्या टपरीवर पैसे घेऊन त्यांना वनखात्यात नोकरी लागल्याचा बनावट नियुक्ती आदेशपत्र देणार होता, असे बोरसे यांनी सांगितले. वनकर्मचाऱ्यांनी त्याची झडती घेतली वनविभागाचे बनावट शिक्के, कागदपत्रे आढळून आली. वनविभागाने दोघा संशयितांना नांदगाव पोलिसांच्या हवाली केले आहे.
...अडीच एकर शेतीची मुलीच्या पित्याकडे मागणी
वनविभागात मोठ्या पदावर असल्याचे सांगत या संशयित तोतया लहू जायभावे याने स्वत:च्या लग्नासाठी एका कुटुंबीयांकडे त्यांच्या मुलीसाठी मागणं घातले. लग्न जमल्यावर मुलीसोबत फोटो काढून तिचे छायाचित्र स्वत;च्या सोशल मीडियावरही पोस्ट केले; मात्र लग्नासाठी त्याने मुलीच्या माता-पित्यांकडे व मुलीकडे अडीच एकर शेतीची मागणी करत धमकावण्यास सुरुवात केल्याचाही प्रकार पुढे येत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे.