नि-हाळे परिसरात भूजल पातळी खालवल्याने हातपंप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 02:16 PM2019-05-14T14:16:34+5:302019-05-14T14:17:05+5:30
नि-हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील नि-हाळे-फत्तेपूर येथील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी यासाठी गावात व वाड्या-वस्त्यांवर ठिक-ठिकाणी हातपंप बसवण्यात आले होते.
नि-हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील नि-हाळे-फत्तेपूर येथील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी यासाठी गावात व वाड्या-वस्त्यांवर ठिक-ठिकाणी हातपंप बसवण्यात आले होते. हातपंप कोणत्या भागात लावायचा, त्याठिकाणी पुरेशा प्रमाणात भूगर्भात पाण्याची सुविधा का याची चाचणी करूनच हातपंप बसवण्यात आले होते. परंतु, पाण्याची पातळी खालवल्याने या हातपंपाकडे यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरावस्था झाली. हातपंप जरजर झाले असतानाही संबंधित यंत्रणांना पाझर फुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. निºहाळे व फत्तेपूर गावात ५ ते ६ हातपंप व माळीवस्ती, थोरात वस्ती, यादववस्ती, शिंगाडे वस्ती, सांगळे मळा, काकड वस्ती, वाघ वस्ती, धनगरवाडा, कांदळकर वस्ती, घोरपडे वस्ती, केकाणे मळा, आदिवासी वस्ती, तांब वस्ती, इंदिरा आवास घरकुल, खापरे वस्ती आदी ठिकाणी सुमारे २० ते २५ हातपंप आहे. त्यात सध्या ५ ते ६ चालु आहेत. हातपंपाची देखभाल ग्रामपंचायतीकडून होत नसल्याने हातपंप बंद आहेत. पंचायत समितीची पाणीपुरवठा विभागाच्या यंत्रणेनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या पाण्याचे दुर्भिक्ष असून गावामध्ये पाण्याचा टॅँकरने पाणी उपलब्ध होते. परंतु, वाड्या-वस्त्यांवर पाणी नाही. वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अनेक वाड्या-वस्त्यावर पाणीपातळी खालवल्याने टंचाई जाणवत आहे. अनेक ठिकाणी टॅँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु, वाड्या-वस्त्यांवर पाण्याचा टॅँकर देत नाही. म्हणून या ठिकाणी असलेले हातपंप पंचायत समितीच्या माध्यमातून दुरूस्ती होणे गरजेचे आहे. हातपंपाना पाणी असून ते नादुस्त असल्याने सध्या बंद अवस्थेत आहे. तरी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सर्व हातपंप दुरूस्त करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.