त्या’ संचालकांचे कानावर हात
By Admin | Published: February 2, 2016 11:41 PM2016-02-02T23:41:46+5:302016-02-02T23:42:15+5:30
जिल्हा बॅँक : नोटिसा निघाल्या; १५ दिवसांची मुदत‘
नाशिक : राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे वटहुकूमात रूपांतर झाल्यानंतर बरखास्तीची ‘झळ’ बसलेल्या संचालकांना अपात्र का ठरविण्यात येऊ नये? यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची मंगळवारी (दि. २) दिवसभर चर्चा सहकार क्षेत्राच्या वर्तुळात होती. सायंकाळी विभागीय सहनिबंधक महम्मद आरीफ यांनी अपात्र ठरू शकणाऱ्या जिल्हा बॅँकेच्या ११ संचालकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती दिली.
या वटहुकूमानुसार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे जे ११ संचालक अपात्र ठरणार आहेत, त्यांच्यापैकी दोघांना या नोटिसा विभागीय सहनिबंधक कार्यालयामार्फत प्राप्त झाल्याची चर्चा होती; मात्र ११ पैकी कोणीही या नोटिसा प्राप्त झाल्याबाबत अधिकृत माहिती देणे टाळले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत राज्य सरकारच्या नवीन वटहुकूमानुसार २१ पैकी ११ संचालक अपात्र ठरणार असून त्यात एका आमदारासह तिघा माजी आमदारांचा व विद्यमान अध्यक्षांचा समावेश आहे. नाबार्डच्या निर्देशानुसार सहकारी बॅँकामध्ये आर्थिक नियम-निकष न पाळल्याने बरखास्तीची वेळ आलेल्या संचालकांना दहा वर्षे सहकार क्षेत्राच्या निवडणुका लढविण्यास बंदी घालणारा वटहूकूम काही दिवसांपूर्वीच काढण्यात आला होता.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवरही नाबार्डच्या निर्देशानुसार बरखास्तीची कारवाई झाल्याने संचालक मंडळ बरखास्त होऊन सुमारे दोन वर्षे जिल्हा बॅँकेवर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे मागील काळात ११ संचालकांना १ फेब्रुवारी रोजीच विभागीय सहनिबंधक कार्यालयाने १५ दिवसात त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुम्हाला वटहुकमानुसार अपात्र का ठरविण्यात येऊ नये? त्यावर आपले म्हणणे व बाजू १५ दिवसात मांडण्यास सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)