पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले कलाकारांचे हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:27 AM2019-08-29T01:27:03+5:302019-08-29T01:27:23+5:30
कलाकार हा मुळातच संवेदनशील असतो. समाजातील संकटकाळी मदतीला धावून येतो. सांगली, कोल्हापूर येथील महापुराने तेथील हजारो माणसांच्या उद््ध्वस्त संसारांना हातभार लावण्याच्या इराद्याने नाशिकच्या चित्रकार, शिल्पकारांनी मांडलेल्या त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनातील कलाकृती विकत घेण्याचे औदार्य दाखवत नाशिकच्या दानशुरांनी कलाकारांच्या कलेचा सन्मान करतानाच पूरग्रस्तांच्या मदतनिधीत योगदान दिले.
नाशिक : कलाकार हा मुळातच संवेदनशील असतो. समाजातील संकटकाळी मदतीला धावून येतो. सांगली, कोल्हापूर येथील महापुराने तेथील हजारो माणसांच्या उद््ध्वस्त संसारांना हातभार लावण्याच्या इराद्याने नाशिकच्या चित्रकार, शिल्पकारांनी मांडलेल्या त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनातील कलाकृती विकत घेण्याचे औदार्य दाखवत नाशिकच्या दानशुरांनी कलाकारांच्या कलेचा सन्मान करतानाच पूरग्रस्तांच्या मदतनिधीत योगदान दिले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे नाशिकच्या अनेक चित्रकार, शिल्पकारांनी एकत्र येऊन त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ रविवारी भारत टाकेकर, सीमा पाटील, श्वेता मालपाणी आणि वेदिका होळकर यांनी केले. या प्रदर्शनातील सर्व छायाचित्रे आणि शिल्प पाच हजार रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आली असून त्यातून मिळणारा सर्व निधी हा सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. सात चित्रकृतींना दानशूर नाशिककरांनी विकत घेत सामाजिक योगदान दिले. या प्रदर्शनात नाशिकच्या प्रथितयश कलाकारांच्या ५० पेक्षा अधिक कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. ३० आॅगस्टपर्यंत चालणारे हे प्रदर्शन दररोज सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाहता येणार आहे. तरी नाशिककरांनी मदतीचा हात पुढे करीत आपला दिवाणखानादेखील सजवावा, असे आवाहन सर्व कलाकारांच्या वतीने करण्यात आले आहे.
गायत्री परिवारातर्फे मदत
गायत्री परिवार युगनिर्माण योजना ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या. यामध्ये पौष्टीक खाद्य सामुग्री, २०० किलो तांदूळ, २०० किलो तूरदाळ, मिठ तसेच विविध प्रकरचे कपडे अशा सुमारे तीन लाख रुपयांचे साहित्य पाठविण्यात आले. याप्रसंगी श्रीकृष्णतीर्थ आश्रमाचे स्वामी रामतिर्थ, गायत्री परिवाराचे कार्यकर्ते मनीभाई पटेल, जीवनभाई राठोड, जयगोविंद पांडे, विनायक गिल्लूरकर, रवींद्र वाघ, सयाजी गांगुर्डे यांचे सहकार्य लाभले. तसेच युवा मंडळाचे कार्यकर्ते राकेश पटेल, प्रणवभाई पुरोहित, रवि पटेल, विशाल नाकराणी, अमृतभाई पटेल यांचेही सहकार्य लाभले. यावेळी गायत्री परिवार युग निर्माण योजना ट्रस्टचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मदतीत बालगोपाळांचाही सहभाग
सिडको परिसरातील चेतनानगर येथील वैभव देवरे व सोनल देवरे यांची ११ वर्षीय मुलगी तेजस्वी व सहा वर्षीय मुलगा शाहू यांनी त्यांचे खाऊचे जमा केलेले वर्षभराचे पैसे पूरग्रस्तांना देऊ केल्याने त्यांचे परिसरातील राहिवाशांकडून कौतुक करण्यात येत आहे. या बहीण-भावाने त्यांना मिळालेली खाऊची रक्कम दिली. वर्षभराची केलेली बचत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूरग्रस्तांसाठी देऊ केली. कुमारी तेजस्वी वैभव देवरे वय ११ व चैतन्य वैभव देवरे वय ६ वर्षे या चिमुकल्यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराच्या बातम्यांनी ही व्यथित झाली. शिवाय ठिकठिकाणांहून पूरग्रस्तांना मदतीचा ओघही सुरू झालेला. त्यामुळे पूरग्रस्त लहान मुलांना आपणही मदत करावी, असा विचार त्यांच्या मनात आला.