पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हात
By admin | Published: August 6, 2016 12:59 AM2016-08-06T00:59:13+5:302016-08-06T01:00:11+5:30
अन्नधान्याचे वाटप : भोजन व्यवस्था
पंचवटी : मंगळवारी आलेल्या पुरामुळे पूरग्रस्त भागातील ज्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते, त्या नागरिकांना मदतीचा हात म्हणून प्रभागाचे नगरसेवक तसेच सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला.
पेठरोडवरील एरंडवाडीत गेल्या मंगळवारी नाल्याचे पाणी शिरल्याने जवळपास दोनशे घरे पाण्यात सापडली होती. प्रभागाचे नगरसेवक तथा उपमहापौर गुरमित बग्गा यांनी तत्काळ प्रशासनाला आदेश दिले, तर नगरसेवक विमल पाटील, नरेश पाटील आदिंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत सुरुवातीला घरकुलात अडकलेल्या सव्वाशे नागरिकांना अग्निशमन दलाला सांगून सुरक्षितस्थळी हलविले. त्यानंतर त्याच दिवशी त्यांची मखमलाबाद नाक्यावरील हिरे विद्यालयात राहण्याची सोय करून त्यांना भोजन
दिले. पुराचे पाणी सरल्यानंतर लागलीच एरंडवाडी भागात औषधफवारणीचे काम करून गाळ स्वच्छ केला. गुरुवारी या कुटुंबीयांना पाच किलो पीठ, दोन किलो तांदूळ आणि एक किलो तूरदाळ वाटप केले. या कामासाठी मराठा हायस्कूल कट्टा, बिल्डर असोसिएशन, जायंट्स ग्रुप आॅफ नाशिक प्राईड या संस्थांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)