कनिष्ठ वकील अन् लिपिकांना बार असोसिएशन देणार मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 04:27 PM2020-03-29T16:27:05+5:302020-03-29T16:27:44+5:30
तसेच पैशांची गरज जास्त असल्यास संबंधीतांना कर्ज सुविधा उपलब्ध करु न देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. वैद्यकीय अडचण असल्यास संबंधितांना वकील कल्याणकारी निधीमधून बार कौन्सिलद्वारे तातडीने मदत दिली जाणार आहे
नाशिक : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजदेखील मर्यादित करण्यात आले आहेत. तसेच वकिलांचे चेंबर्सही बंद ठेवण्यात आले आहे, जेणेकरुन लॉकडाऊन काळात न्यायालयाच्या आवारात गर्दी होणार नाही. या पार्श्वभूमीवर ज्युनिअर वकिल, लिपिकांकरिता नाशिक बार असोसिएशन व बार कौन्सिल आॅफ महाराष्टÑ अॅन्ड गोवाकडून मदतीचा हात दिला जाणार आहे.
कोरोनामुळे देशात संचारबंदी लागू झाल्याने अनेकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवा व नाशिक वकील संघानेही आता पुढाकार घेतला आहे. त्यानुसार सदस्यांनी चर्चा करु न कनिष्ठ वकील व लिपिकांना मदत करण्याचा तत्वत: निर्णय घेतला आहे. त्यानुसार मर्यादित आर्थिक किंवा किराणा स्वरुपात मदत केली जाणार आहे. तसेच पैशांची गरज जास्त असल्यास संबंधीतांना कर्ज सुविधा उपलब्ध करु न देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. वैद्यकीय अडचण असल्यास संबंधितांना वकील कल्याणकारी निधीमधून बार कौन्सिलद्वारे तातडीने मदत दिली जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी नाशिक वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत दोन दिवसांत संपर्क साधावा असे आवाहन वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी केले आहे.