मदतीचे हात सरसावले पुढे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:16 PM2020-03-24T22:16:54+5:302020-03-25T00:19:24+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांनी योगदान देणाऱ्यांचे हात पुढे येत आहेत. नाशिकमधील जैन समाजातील विविध संस्थांनी विविध ठिकाणच्या मिळून तब्बल २७४ खोल्या प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आवश्यकता भासल्यास या खोल्या प्रशासनाला संशयितांना क्वारंटाइन करण्यासाठी वापरता येणार आहेत.
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांनी योगदान देणाऱ्यांचे हात पुढे येत आहेत. नाशिकमधील जैन समाजातील विविध संस्थांनी विविध ठिकाणच्या मिळून तब्बल २७४ खोल्या प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आवश्यकता भासल्यास या खोल्या प्रशासनाला संशयितांना क्वारंटाइन करण्यासाठी वापरता येणार आहेत.
विदेशांतील स्थिती पाहता कोरोनाची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात क्वारंटाइन करण्यासाठी अधिकाधिक सार्वजनिक जागांची व्यवस्था प्रशासनाला करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जैन समाजाने पुढाकार घेत त्यांच्या संस्थांच्या ताब्यातील २७४ खोल्या मनपा प्रशासनाला रुग्ण क्वारंटाइन करण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत.
जैन समाजाच्या संस्थाप्रमुखांनी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन देण्यासह उपलब्ध जागांची माहिती दिली.
त्यावेळी श्री जैन ओसवाल बोर्डिंगचे प्रमुख शशिकांत पारख,विल्होळीचे धर्मचक्र प्रभाव तीर्थचे विलास शहा, म्हसरूळचे दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथच्या सुवर्णा काले, चोपडा लॉन्सचे संचालक सुनील चोपडा, भारतीय जैन संघटनेचे समन्वयक नंदकुमार सांखला, जितोचे समन्वयक सतीश हिरण आणि नामको हॉस्पिटल
सेवा सदनचे पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यासह, राज्य आणि देशभरातील विविध भागांतून अनेक नागरिक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शहरातील विविध रस्त्यांच्या कडेला पाल ठोकून राहतात, तर काहीजण उड्डाण पूल व शहर परिसरातील वेगवेगळ्या मैदानांवर आश्रय शोधून दिवसभर काम करून आपल्या पोटाची भूक भागवतात. परंतु, गेल्या आठवडाभरापासून अशा हातावर पोट असणाºया नागरिकांचे काम बंद असल्याने त्यांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे.
या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अद्वैत मानवता ग्रुपच्या केतन शाह, दीपक शाह, अजय चौधरी, भावेश शाह, रोमील शाह यांनी एकत्र येऊन रोज किमान ५० गरजूंना दोन वेळचे भोजन पुरविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचप्रमाणे पंचवटीतील राजू पोद्दार, फावडे लेन येथील शीतल वाघ यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेत रस्त्यावरील वंचितांना दोन वेळचे अन्न पुरविण्याचे काम हाती घेतले आहे.
गोरगरिबांसाठी अन्नदान !
कोरोनाच्या सावटावर मात करण्यासाठी प्रशासन झटत असताना त्यातील काही कठोर निर्बंधांमुळे समाजातील हातावर पोट असणारे गोरगरीब, पाल ठोकून राहणारी मजूर कुटुंबे आणि निराश्रित वृद्ध यांचाही जीव वाचवला पाहिजे, या उद्देशाने काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात संचारबंदीची घोषणा केल्यानंतर रस्त्याच्या कडेला राहणाºया बेघरांचे, हातावर पोट असलेल्या मजूर व कामगारांचे काय होणार याविषयी? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना शिंगाडा तलाव परिसरातील अद्वैत मानवता ग्रुपने सामाजिक भान जपत अशा सर्व घटकांसाठी मदतीचा हात देत दोन वेळचे अन्न पुरविण्याचे काम सुरूकेले आहे.