नाशिक महापालिकेत महत्त्वाची खाती प्रभारींच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:43 PM2018-04-30T16:43:39+5:302018-04-30T16:43:39+5:30

पदे रिक्त : वरिष्ठ अधिकाऱ्यांची वानवा, शासनाकडे मागणी

In the hands of important accounts in Nashik municipal corporation | नाशिक महापालिकेत महत्त्वाची खाती प्रभारींच्या हाती

नाशिक महापालिकेत महत्त्वाची खाती प्रभारींच्या हाती

Next
ठळक मुद्देआयुक्तांनी सुमारे १४ अधिका-यांची प्रतिनियुक्तीवर मागणी शासनाकडे केली आहेसन २०१८ मध्ये तब्बल १४५ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत

नाशिक : महापालिकेत पुरेसे मनुष्यबळ असल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे एकीकडे करत असले तरी, सद्यस्थितीत अनुभवी वरिष्ठ अधिका-यांची वानवा भासत आहे. पालिकेत महत्त्वाची खाती ही प्रभारींच्या हाती सोपविण्यात आलेली आहेत. त्यामुळे आयुक्तांनी सुमारे १४ अधिका-यांची प्रतिनियुक्तीवर मागणी शासनाकडे केली आहे. परंतु, शासनाची एकूणच भूमिका लक्षात घेता महापालिकेला अधिकारी मिळणे अवघड मानले जात आहे.
महापालिकेत ७०९० पदे मंजूर आहेत. त्यातील सुमारे १७०० पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्चाचा डोलारा वाढत असल्याने शासनाकडून नोकरभरतीला मनाई आहे. त्यात दरमहा सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांची संख्या वाढत चालली आहे. सन २०१६ मध्ये महापालिकेतून १११ कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर सन २०१७ मध्ये ती संख्या १३३ इतकी होती. सन २०१८ मध्ये तब्बल १४५ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. सन २०१९ मध्ये तर अनेक महत्त्वाच्या पदांवरील अधिका-यांसह बव्हंशी कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणावर कुशल व अनुभवी कर्मचा-यांची आवश्यकता भासणार आहे. गेल्या वर्षी १३३ कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना दोन वैद्यकीय अधिका-यांनी राजीनामे दिले शिवाय, शहर अभियंता सुनील खुने, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बनकर, भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एम. गायकवाड, कार्यकारी अभियंता एस. वाय. पवार आणि विधी विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग चोखाळला. चार दिवसांपूर्वी शहर अभियंता उत्तम पवार हे निवृत्त झाले. सद्यस्थितीत, महापालिकेत उद्यान अधीक्षक, आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, उपआयुक्त प्रशासन, शहर अभियंता आदी महत्त्वाची पदे प्रभारींच्या हाती आहेत. त्यात, मुख्य लेखापरीक्षकांकडे प्रशासनाचा अतिरिक्त कारभार असल्याने त्यांची तारांबळ उडताना दिसते, तर आरोग्य व वैद्यकीय या दोन महत्त्वाच्या खात्यांवर प्रभारी नेमणुका आहेत. कर विभागाची जबाबदारी सांभाळणारे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांचाही कालावधी संपुष्टात आलेला आहे, तर नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागुल यांचा कालावधी जूनमध्ये संपुष्टात येईल. महापालिकेत कर्मचारीवर्ग पुरेसा आहे परंतु, अधिकारीवर्गाची वानवा आहे, हे वास्तव आयुक्तांनीही मान्य केले आहे. त्यानुसार, त्यांनी शासनाकडे अधिका-यांची मागणी केलेली आहे. परंतु, शासनाची एकूणच सावध भूमिका पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिकारीवर्ग महापालिकेला मिळण्याची शक्यता कमीच मानली जात आहे.
 

Web Title: In the hands of important accounts in Nashik municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.