परराज्यातून परतणाऱ्या मजूरांच्या मदतीसाठी सरसावले हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 03:41 PM2020-03-29T15:41:14+5:302020-03-29T15:41:47+5:30
देशात लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर गावाकडे परतू लागले आहेत. प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने हे मजूर पायपीट करीत रवाना होत आहेत. महाराष्ट्र व गुजरात सीमेलगत जिरवाडे चेकपोस्टवर अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड व त्यांचे सहकारी खासगी वाहन, प्रवाशांच्या चौकशीबरोबर पायपीट करणाºया मजुरांना अन्न पाण्याच्या मदतीचा हात देत आहेत. जिल्ह्यात व तालुक्याच्या विविध भागात मजुरांना व स्थानिक गरजू कुटुंबांना जेवणासह जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.
कळवण : देशात लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर गावाकडे परतू लागले आहेत. प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने हे मजूर पायपीट करीत रवाना होत आहेत. महाराष्ट्र व गुजरात सीमेलगत जिरवाडे चेकपोस्टवर अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड व त्यांचे सहकारी खासगी वाहन, प्रवाशांच्या चौकशीबरोबर पायपीट करणा-या मजुरांना अन्न पाण्याच्या मदतीचा हात देत आहेत. जिल्ह्यात व तालुक्याच्या विविध भागात मजुरांना व स्थानिक गरजू कुटुंबांना जेवणासह जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.
गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणा-यांसाठी जिरवाडे येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. गुजरात राज्यातून हातगड व वीरशेत मार्गे बहुतांशी मजूर आपल्या घराकडे पायपीट करीत निघाले आहेत. त्यात काही सुरगाणा भागातील तर काही कळवण तालुक्यातील आहेत. कोरोना विषाणूच्या संक्र मणाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत गावाकडे पायी निघालेल्या शेतमजुरांचा रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह चालतो. हाताला काम मिळाले तरच पोटाला भाकरी मिळते. मात्र लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तुविना बेहाल झालेले मजूर शेकडो किमी पायी प्रवास करीत घराकडे निघाल्याने त्यांना विश्रांतीचा सल्ला तसेच चहा, पाणी,जेवण, बिस्कीट, सॅनिटायझरसह आवश्यक ती मदत जिरवाडे चेकपोस्टवर केली जात आहे.