कारागृहातील कैद्यांचे हात राहिले सुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:52+5:302021-08-24T04:18:52+5:30
नाशिक: कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदी बांधवांना बहिणीचे प्रेम मिळावे आणि रक्षा बंधनाला त्यांच्याही हातावर राखी सजावी या उदात्त ...
नाशिक: कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदी बांधवांना बहिणीचे प्रेम मिळावे आणि रक्षा बंधनाला त्यांच्याही हातावर राखी सजावी या उदात्त हेतूने दरवर्षी अनेक सामाजिक संस्थांच्या भगिनी कारागृहातील बंदी बांधवांच्या मनगटावर राखी बांधतात. परंतु यंदा कोरोनामुळे कारागृहात कुणालाही परवानगी देण्यात आली नसल्याने कारागृहात रक्षाबंधनाचा सण साजरा होऊ शकला नाही.
जाणते अजाणतेपणाने हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे अनेकांच्या नशिबी कारागृह येते आणि समाजापासून त्यांना दूर ठेवले जाते. सणांच्या वेळी यातील अनेकांना कुटुंबाची आठवण होत असावी. विशेषत: रक्षाबंधनाच्या सणाला तर प्रकर्षाने आयुष्यातील या पोकळीची आठवण होते आणि कैद्यांमधील संवेदनशील भावाच्या भावना त्याच्या डोळ्यात दिसणाऱ्या मायेचा ओलाव्याने जीवंत असल्याची प्रचिती देतात. त्यांच्या या भावनांचा आदर करून दरवर्षी अनेक सामाजिक संस्थांच्या भगिनी बंदिवानांना राखी बांधून रक्षा बंधन सण कारागृहात साजरा करतात. कोरोनामुळे असलेल्या निर्बंधामुळे यंदा या बंदिवानांच्या नशिबी राखी नसल्याने या बांधवांचे हात सुनेसुने राहिले. कारागृहात कुणालाही परवानगी नसल्यामुळे सामाजिक जाणिवेचा हा सोहळा होऊ शकला नाही.
--इन्फो--
चार दिवसांनी पोहोचणार राख्या
अनेक महिला मंडळे, रोटरी, लायन्स सारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांकडून कारागृहाकडे परवानगी मागितली होती. परंतु त्यांना परवानगी नसल्याने त्यांनी कारागृहाकडे केवळ राख्या पाठवून दिल्या आहेत. कारागृहात राख्या पोहचल्या असल्या तरी त्या कैद्यांपर्यंत पोहचण्यासाठी चार दिवस लागणार आहेत. कोरोना विषाणूमुळे आलेल्या राख्या लागलीच कैद्यांपर्यंत पोहचू नये याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत या राख्या चार दिवसांनी पोहचविल्या जाणार आहेत.
--कोट--
बंदिवानांच्या आरोग्याची दक्षता
राज्यात कोरोना निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे विनाकारण गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळेच यंदा कारागृहात रक्षा बंधनाच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र या भगिनींच्या भावनांचा आदर करून त्यांनी पाठविलेल्या राख्या स्वीकारण्यात आलेल्या आहेत. या राख्या बंदी बांधवांपर्यंत पोहचविल्या जातील.
- प्रशांत वाघ, नाशिकरोड कारागृह अधीक्षक