मजुरांचे हात झाले ‘लॉक’, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:14 AM2021-05-06T04:14:30+5:302021-05-06T04:14:30+5:30
वाके : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले ...
वाके : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. अशातच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांची संख्या मोठी असल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिला आहे. हातावर पोट असलेल्या मजुरांच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी तसेच दानशूर व्यक्तींबरोबर सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, जिल्हा व तालुका प्रशासन सामान्य जनतेची चांगली काळजी घेत कोरोनाच्या महामारीशी यशस्वीपणे झुंज देत आहेत. दरम्यान, लॉकडाऊन काळात नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मात्र, लघुव्यावसायिक व मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. एकीकडे कोरोनाची दहशत तर दुसरीकडे आर्थिक संकटाची भीती निर्माण होत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासन सर्व प्रकारच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवित आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने ‘ब्रेक द चेन’मुळे १५ मेपर्यंत बंद आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ठरावीक वेळ निश्चित करून दिली आहे. अगोदरच काही उद्योग वगळता इतर कामधंदे बंद असल्याने मजुरांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. लॉकडाऊन वाढल्यामुळे मजुरांच्या संकटात भर पडली आहे.