हनुमान जन्मस्थळाचा वाद मुद्द्यावरून गुद्द्यावर; दोन महंत आपसात भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 07:53 PM2022-05-31T19:53:12+5:302022-05-31T19:53:56+5:30
Hanuman birthplace dispute : धर्मसभेत चर्चा सुरू असताना चर्चा भरकटली महंत सुधीर पुजारी यांनी द्वारकापीठाधिश्वर शंकाराचार्य कॉंग्रेसधार्जिणे असल्याचे विधान करताच गोविंदानंद संतापले आणि त्यांनी पुजारी यांना माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका घेतली.
नाशिक : रामभक्त हनुमान यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाल्याने बोलविण्यात आलेल्या धर्मसभेत चर्चा भरकटली आणि शंकराचार्यांच्या मुद्द्यावरून प्रकरण गुद्द्यापर्यंत पोहोचले. महंत सुधीरदास पुजारी यांनी माईक उगारला, तर स्वामी गोविंदानंद सरस्वतीही धाऊन गेल्याने प्रचंड गदारोळ झाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. या गदारोळात मात्र हनुमान यांच्या जन्मस्थळाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय
होऊ शकला नाही.
कर्नाटकहून रथयात्रा घेऊन त्र्यंबकेश्वर येथे आलेले स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाही, तर कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा करीत जन्मस्थळाचा वाद उकरून काढला होता. या
वादावर चर्चा करण्यासाठी आज नाशिकरोडला धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील आखाड्यांचे साधू-महंत, पुजारी, वेद अभ्यासक यांनी स्वामी गोविंदानंद सरस्वती यांचे आव्हान स्वीकारत अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा धर्मसभेत केला. तरीही स्वामी गोविंदानंद अडून बसल्याने वाद विकोपाला गेला.
धर्मसभेत चर्चा सुरू असताना चर्चा भरकटली महंत सुधीर पुजारी यांनी द्वारकापीठाधिश्वर शंकाराचार्य कॉंग्रेसधार्जिणे असल्याचे विधान करताच गोविंदानंद संतापले आणि त्यांनी पुजारी यांना माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका घेतली. या मुद्द्यावरून वाद वाढत गेला आणि सुधीर पुजारी यांनी गोविंदानंद यांच्यावर माईक उगारला. नाशिकच्या इतर साधू-महंतांनीही गोविंदानंद यांना घेरले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत गोविंदानंद यांना एका खोलीत आणून बसविले तर इतर साधुगणांना हॉलच्या खाली जाण्यास सांगितले. महंत सुधीरदास जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत नाशिक सोडणार नसल्याची भूमिका गोविंदानंद सरस्वती यांनी घेतली. रात्री उशिरापर्यंत ते आपल्या भूमिकेवर ठाम होते.