शहरात आज हनुमान जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:31 AM2019-04-19T00:31:39+5:302019-04-19T00:31:54+5:30
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरासह उपनगरांमधील विविध हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) पहाटेपासूनच पूजा, अभिषेक, होमहवन, जन्मोत्सव, भजन, कीर्तन, महाप्रसाद, शोभायात्रा आदींसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरासह उपनगरांमधील विविध हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) पहाटेपासूनच पूजा, अभिषेक, होमहवन, जन्मोत्सव, भजन, कीर्तन, महाप्रसाद, शोभायात्रा आदींसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हनुमान मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, उन्हापासून भाविकांच्या संरक्षणासाठी मंडप उभारण्यात आला आहे.
पंचवटी, पवननगर, सिडको, सातपूर, गंगापूररोड, मेरी, नाशिकरोड आदी सर्व ठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये, मंडळे, संस्थांमध्ये पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी खास नियोजन करण्यात आले आहे. काळाराम मंदिरात दासबोध पारायणाने वासंतिक महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे. काळाराम मंदिरात हनुमान जन्मोत्सव व दासबोध पारायण याद्वारे वासंतिक नवरात्रोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.
गंगापूररोडवरच्या नसती उठाठेव मित्रमंडळातर्फे जन्मोत्सवानिमित्त सत्यनारायण पूजा, महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. पवननगर बसस्टॉप येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त ध्वजारोहण, जन्मोत्सव, महाआरती, रुद्राभिषेक, महाप्रसाद; दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्रीराम याग, नाशिकरोडला महेश सत्संग मंडळातर्फे हनुमान चालिसा पठण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.