'शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच, ती महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:59 AM2022-06-13T11:59:20+5:302022-06-13T12:00:07+5:30
येवला येथे सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली.
मुंबई - देशात आता राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसकडूनही आपला उमेदवार देण्यासाठी धावाधाव आणि गाठीभेटी होत आहेत. त्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर, आता छगन भुजबळ यांनीही शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदाची गोष्ट असून महाराष्ट्राकरिता गर्वाची बाब राहील, असे म्हटले आहे.
येवला येथे सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली. उद्धव ठाकरे यांना ममता बॅनर्जीं राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात आमंत्रण दिले असून यावेळी राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव सुचविले जाणार आहे. यासंदर्भातच भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
यासंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की, ममता बॅनर्जींनी विरोधी पक्षाचे सर्वच मुख्यमंत्री, तसेच विरोधी पार्टीचे प्रमुख नेत्यांना आमंत्रित केलं आहे. या सर्व नेतेमंडळींसोबत बैठक घेऊन राष्ट्रपती पदासाठी कोणाला उभे केले जावे, याची चाचपणी बॅनर्जी करत आहेत. याबाबत सर्वच विरोधीपक्ष नेत्यांशी विचार विनिमय करत शरद पवार यांचे नाव पुढे आले आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी हो म्हटले की नाही, हे मला माहित नाही, असे भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रातून शरद पवार हे एवढ्या मोठ्या पदावर गेल्यास नक्कीच आनंदाची व गर्वाची गोष्ट महाराष्ट्र करता राहील, असेही पुढे त्यांनी म्हटले.
'शरद पवारांना काँग्रेसचा पाठिंबा'
राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. 'शरद पवारांना जर राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केले, तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल', असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.