रात्री हॅप्पी बर्थ डे, सकाळी अंत्यविधीचा दुर्दैवी प्रसंग; कोब्रा जातीचा साप चावल्याने बालकाचा मृत्यू!
By धनंजय वाखारे | Published: June 24, 2024 12:20 PM2024-06-24T12:20:33+5:302024-06-24T12:21:33+5:30
सर्पदंशाने वटारला बालकाचा मृत्यू
मनोज बागुल, वटार (नाशिक ) : नियती खूप कठोर असते. तिच्यापुढे कुणाची मात्रा चालत नाही. रात्री मुलाची वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या माता-पित्याला सकाळी आपल्या एकुलत्या एक मुलाचा अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ आली. येथील सागर ज्ञानदेव खैरणार यांचा एकुलता एक मुलगा स्वराज याला सोमवारी (दि. २४) पहाटे चार वाजेच्या दरम्यान अतिविषारी सर्पाने दंश केला आणि उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
वेळ-काळ कसा येईल ते सांगता येत नाही. रविवारी स्वराजचा वाढदिवस होता. रात्री सर्व कुटुंबाने मोठ्या आनंदाने स्वराजचा वाढदिवस साजरा केला. सर्व कुटुंब झोपेत असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास अतिविषारी सर्पाने स्वराजला दंश केल्याचे लक्षात आले. त्याला तत्काळ सटाणा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आले. परंतु ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यास मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
दरम्यान, सर्प मित्र देवा पवार यांनी पलंगाखाली लपलेल्या पहाडी कोब्रा जातीच्या सापाला लगेच पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.