हॅपी बर्थ डे, पंचवटी एक्स्प्रेस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:21 PM2017-11-01T23:21:32+5:302017-11-02T00:14:10+5:30
बुधवारी सकाळी नाशिकरोडच्या रेल्वेस्थानकावर वेगळीच लगबग दिसून येत होती. धावपळ तर नेहमीचीच होती, परंतु तरीही वेगळेपण होते, एखाद्या उत्सवाला साजसे वातावरण होते. अखेर सकाळी सात वाजेच्या सुमारास फुलांनी सजवलेली रेल्वे फलाटावर आली आणि ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करताना प्रवाशांच्या मुखातून शब्द बाहेर पडले हॅपी बर्थ डे टू पंचवटी एक्स्प्रेस...
नाशिकरोड : बुधवारी सकाळी नाशिकरोडच्या रेल्वेस्थानकावर वेगळीच लगबग दिसून येत होती. धावपळ तर नेहमीचीच होती, परंतु तरीही वेगळेपण होते, एखाद्या उत्सवाला साजसे वातावरण होते. अखेर सकाळी सात वाजेच्या सुमारास फुलांनी सजवलेली रेल्वे फलाटावर आली आणि ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करताना प्रवाशांच्या मुखातून शब्द बाहेर पडले हॅपी बर्थ डे टू पंचवटी एक्स्प्रेस... कुटुंबातील सदस्यांचा किंवा कोणा मित्रमंडळीचा वाढदिवस साजरा करावा असाच हा क्षण होता. गेल्या ४२ वर्षांपासून चाकरमाने, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची ने-आण करणारी पंचवटी एक्स्प्रेस नाशिककरांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळेच कुटुंबातील सदस्याचा भासावा, अशा पध्दतीचा दिमाखदार वाढदिवस सोहळा पार पाडला. सकाळी साजरा झालेल्या या सोहळ्यासाठी खास पंचवटी एक्स्प्रेसची प्रतिकृती असलेला केक तयार करण्यात आला होता. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, सल्लागार समिती सदस्य राजेश फोकणे, नितीन चिडे, रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी, स्टेशन अधीक्षक एम. बी. सक्सेना यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच खासदार गोडसे यांच्या हस्ते पंचवटी रेल्वेचालक आणि गार्ड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. इंजिनला फुलांचे हार लावून सजविण्यात आले होते. या सोहळ्यासाठी रेल परिषदेचे बिपीन गांधी, देवीदास पंडित, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक जुबेर पठाण, किरण बोरसे, दिलीप सातपुते, संजय केदारे, कैलास बर्वे, इजाज शेख, धनंजय कुशारे, राजेंद्र पाटील, तानाजी गायधनी, चेतन बुरकुल, गोपाळ नाईक, नितीन जगताप, दत्ता गोसावी, प्रसाद पवार, पवन शिंदे, संजय शिंदे, सागर सोनवणे, बाळा गायकवाड आदींसह प्रवासी उपस्थित होते.
१९७५ ला हिरवा झेंडा
१ नोव्हेंबर १९७५ मध्ये सुरू झालेल्या या रेल्वेला तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर पंचवटी एक्स्प्रेस अविरत धावत आहे. सुरुवातीला १९ डब्यांची असलेल्या या रेल्वेला कालांतराने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन २१ डबे करण्यात आले.
नाशिकचे अतुट नाते
पंचवटी आणि नाशिककरांचे गेल्या ४२ वर्षांपासून अतूट आणि भाविनक असे नाते आहे. नाशिकहून मुंबईला जाणारे आणि मुंबईहून नाशिकमध्ये येणारे चाकारमानांबरोबरच आप्तेष्टही पंचवटी एक्स्प्रेसमधूनच प्रवास करतात. त्यामुळेच सुखदु:खाच्या कोणत्याही कामांचे नियोजन पंचवटीच्या वेळेनुसार आखले जाते हे विशेष. पंचवटीच्या पासधारक बोगीमधून प्रवास करणाºया प्रवाशांचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.