प्रत्येक मतदारसंघात एक सखी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:38 AM2019-10-17T01:38:28+5:302019-10-17T01:38:47+5:30
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राबविण्यात येत असलेल्या सखी मतदान केंद्राची संकल्पना विधानसभा निवडणुकीतही राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे एकूण १५ सखी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रातील सर्व जबाबदाऱ्या या महिलाच सांभाळणार आहेत.
नाशिक : मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राबविण्यात येत असलेल्या सखी मतदान केंद्राची संकल्पना विधानसभा निवडणुकीतही राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे एकूण १५ सखी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रातील सर्व जबाबदाऱ्या या महिलाच सांभाळणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या संकल्पनेतून सखी मतदान केंद्राची संकल्पना समोर आली आणि या केंद्राच्या माध्यमातून निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करण्यासाठी महिला अधिक पुढे येत असल्याचे समोर आले. त्यामुळे हा प्रयोग विधानसभेतही केला जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सखी केंद्र असलेल्या ठिकाणी तेथे नियुक्त कर्मचाऱ्यांनी अभिनव संकल्पना राबवून सखी केंद्रच सजविले होते. काही केंद्रांवर तर येणाºया महिला मतदारांचे पारंपरिक मराठी संस्कृतीनुसार औक्षण केले जात होते.
महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या सखी केंद्राबाबत यंदाही निवडणूक शाखेने तयारी केली असून, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रांमधील एका केंद्रावर सखी केंद्र असणार आहे. या केंद्रावर सुरक्षा कर्मचाºयांपासून ते सहायक निवडणूक अधिकाºयापर्यंत सर्व कर्मचारी या महिलाच असणार आहेत. या महिला कर्मचाºयांना सखी केंद्रातील नियुक्तीबाबत प्रशिक्षण देण्यात आले असून, या केंद्रांना त्या आपापल्या पद्धतीने आकर्षक पद्धतीने सजवू शकणार आहेत. शक्यतो गुलाबी रंगाचा वापर करून महिला सबलीकरणाचा संदेश देण्यासाठी गुलाबी रंगाचा वापर करण्याचा पर्यायदेखील पुढे आला आहे. त्यानुसार यंदा विधानसभेसाठी तयार करण्यात आलेले सखी केंद्र सजविले जाणार आहे.
जिल्ह्यात एकूण १५ विधानसभा मतदारसंघांतील ४४४६ व अंदाजे १३९ साहाय्यकारी मतदान केंद्रांसाठी २७१९४ एवढे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. प्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे एकूण १५ सखी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.२
६० संवेदनशील मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीकरिता मूळ मतदान केंद्रे ४४४६ आणि २७४ इतकी साहाय्यकारी मतदान केंद्रे अशा एकूण ४७२० मतदान केंद्रांवर निवडणूक घेण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता १५०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रासाठीच साहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्याबाबत निर्देश दिले आहेत.३
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीकरिता मतदान केंद्रांची संख्या ही लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी राहणार आहे. साधारणत: १५० एवढे साहाय्यकारी मतदान केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. एकूण मतदान केंद्रे साधारणत: ४५९६ इतकी राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनेनंतर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज असून, मतदान यंत्रांपासून ते मतदारांच्या सुविधांचे काटेकोर नियोजन करण्यात आलेले आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले शक्यतो त्याच मतदान केंद्रांवर विधानसभेचे मतदान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.